‘जायंट किलर’ हे बिरुद सार्थ ठरवताना आर्यलडने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. सेक्सटन ओव्हलवरील आपल्या पहिल्या सामन्यात आर्यलडने चक्क वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का देत सावधानतेचा इशाराच जणू दिला आहे.
वेस्ट इंडिजचे ३०५ धावांचे अवघड आव्हान आर्यलडने ४५.५ षटकांत लीलया पेलले आणि चार विकेट राखून आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळवला. पॉल स्टर्लिग, एड जॉयसे आणि निल ओ’ब्रायन यांच्या अर्धशतकांनी आर्यलडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्टर्लिगने सातवे एकदिवसीय अर्धशतक झळकावून विजयाची पायाभरणी केली. स्टर्लिगने कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड (२३) सोबत ७१ धावांची विजयी सलामी नोंदवली. मग त्याने जॉयसेसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. ८४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ९२ धावांची खेळी साकारून स्टर्लिग २८व्या षटकात माघारी परतला. जॉयसेने १० चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा काढल्या, तर ओ’ब्रायनने ६० चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. जॉयसे आणि ओ’ब्रायन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. विंडीजचा मध्यमगती गोलंदाज जेरॉम टेलरने जॉयसे, अँडी बाल्बीर्नी आणि गॅरी विल्सन यांना बाद करून आशा दाखवली. केव्हिन ओ’ब्रायन भोपळासुद्धा फोडू शकला नाही; पण नेलने मात्र संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजचा निम्मा संघ ८७ धावांत तंबूत परतला. डावखुरा फिरकी गोलंदाज जॉर्ज डॉकरेलने तीन बळी घेत विंडीजच्या आघाडीच्या फळीला हादरे दिले; परंतु लेंडल सिमन्स (१०२) व डॅरेन सॅमी (८९) यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यामुळे विंडीजला ७ बाद ३०४ धावा करता आल्या.
भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश असलेल्या ब-गटात आर्यलड हा संघ पुन्हा धोकादायक सिद्ध होत आहे.

विश्वचषक स्पध्रेमधील आर्यलडचे धक्के
१७ मार्च २००७, जमैका
पाकिस्तान : ४५.४ षटकांत सर्वबाद १३२ (कामरान अकमल २७; बॉइड रॅनकिन ३/३२) पराभूत विरुद्ध आर्यलड : ४१.४ षटकांत १३३/७ (निआल ओ’ब्रायन ७२, मोहम्मद सामी ३/२९)
सामनावीर : नेल ओ’ब्रायन

२ मार्च २०११, बंगळुरू

इंग्लंड : ५० षटकांत ८ बाद ३२७ (जोनाथन ट्रॉट ९२, इयान बेल ८१, केव्हिन पीटरसन ५९; जॉन मूनी ४/६३) पराभूत विरुद्ध आर्यलड : ४९.१ षटकांत ७ बाद ३२९ (केव्हिन ओब्रायन ११३, अ‍ॅलेक्स क्युसॅक ४७, जॉन मुनी ३३, ग्रॅमी स्वॉन ३/४७)
सामनावीर : केव्हिन ओ’ब्रायन

१६ फेब्रुवारी २०१५, नेल्सन
वेस्ट इंडिज : ५० षटकांत ७ बाद ३०४ (लेंडल सिमन्स १०२, डॅरेन सॅमी ८९; जॉर्ज डॉकरेल ३/५०) पराभूत वि. आर्यलड : ४५.५ षटकांत ६ बाद ३०७ (पॉल स्टर्लिग ९२, एड जॉयसे ८४, निल ओ’ब्रायन नाबाद ७९; जेरॉम टेलर ३/७१)
सामनावीर : पॉल स्टर्लिग.

अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी सॅमी व मुनी यांना दंड
नेल्सन : विश्वचषकाच्या साखळी लढतीत अर्वाच्य भाषा वापरल्याच्या स्वतंत्र घटनांबद्दल वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन सॅमी आणि आर्यलडचा गोलंदाज जॉन मुनी यांच्या सामन्याच्या मानधनातील ३० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली आहे. त्यांनी आयसीसीच्या आचारसंहितेच्या पहिल्या स्तरावरील कलम २.१.४चा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात हे प्रकार घडले. ३४व्या षटकात सॅमी फलंदाजीसाठी मैदानावर असताना संतापून अर्वाच्य भाषेत बोलताना आढळला, तर ४५व्या षटकात क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यावर मुनीने शिवी दिल्याचे दिसून आले.

हा शानदार विजय आहे. पुढील सामन्यांसाठी हा विजय प्रेरणादायी ठरेल. गेल्या काही काळात संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे आणि आता आम्हाला आमच्या क्षमतेचा अंदाज आला आहे. आर्यलडचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होईल, यावर माझा विश्वास आहे. आम्ही फक्त स्वत: सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विल्यम पोर्टरफिल्ड (आर्यलडचा कर्णधार)

जर आम्ही अशाच प्रकारे खेळलो, तर आम्हाला विश्वचषकात फार काळ टिकाव धरता येणार नाही. आम्ही ३०० धावा केल्या आणि विजयाबाबत निर्धास्त राहिलो. आर्यलडच्या संघाने विश्वचषकात अनेक धक्कादायक विजय नोंदवले आहेत. त्यांना गृहीत धरण्याची आम्ही चूक केली. आमची गोलंदाजी चांगली झाली नाही. पुढील सामन्यात सुधारणा करण्यासाठी या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
– डॅरेन सॅमी, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू