भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Star Sports वाहिनीवर एका खास कार्यक्रमात इरफान पठाणने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. इरफानने आतापर्यंत १२० वन-डे, २९ कसोटी आणि २४ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तब्बल १५ वर्ष इरफान भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत होता.

पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात घेतलेल्या हॅटट्रीकमुळे इरफान पठाण पहिल्यांदा चर्चेत आला. आपल्या नैसर्गिक शैलीमुळे पठाणने फार कमी कालावधीत टीम इंडियात आपलं स्थान पक्क केलं होतं. चेंडू स्विंग करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे इरफानने दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपल यांच्याकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र आली, यावेळी इरफानला फलंदाजीत बढती देऊन तिसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी दिली. मात्र याचदरम्यान त्याच्या कामगिरीत घसरण पहायला मिळाली.

मात्र आपल्या झुंजार स्वभावाला साजेशी कामगिरी करत इरफानने दमदार पुनरागमन करत आपलं संघातलं स्थान कायम राखलं. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयात पठाणचाही मोलाचा वाटा होता. एक नजर इरफान पठाणच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर…

  • २९ कसोटी – १०० बळी (सर्वोत्तम कामगिरी – ७/५९)
  • १२० वन-डे – १७३ बळी (सर्वोत्तम कामगिरी – ५/२७)
  • २४ टी-२० – २८ बळी (सर्वोत्तम कामगिरी – ३/१६)

Story img Loader