वर्ल्डकप २०२३मध्ये अफगाणिस्ताननं सोमवारी पाकिस्तानचा तब्बल ८ विकेट्स राखून धुव्वा उडवला. विश्वचषकात पहिल्यांदाच अफगाणिस्ताननं पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तसेच, यंदा पहिल्यांदाच अफगाणिस्ताननं विश्वचषक स्पर्धेत दोन विजय साजरे केले आहेत. या विजयानंतर अफगाणिस्तान गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेपावला आहे. मात्र, एकीकडे अफगाणिस्तानच्या या मोठ्या विजयाची चर्चा होत असताना दुसरीकडे आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे. ती म्हणजे इरफान पठाण आणि राशिद खान यांनी विजयानंतर धरलेला ठेका. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
या सगळ्या घडामोडींची सांगड इरफान पठाणच्या पोस्टमुळे लागली. इरफान पठाणनं अफगाणिस्तानच्या विजयानंतर एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये या विशेष ‘नृत्याविष्कारा’चं गमक सांगितलं. दोघांचे नाचतानाचे फोटो शेअर करताना “राशिद खाननं त्याचं वचन पाळलं, मी माझं वचन पूर्ण केलं. खूप मस्त खेळलात मित्रांनो”, अशी पोस्ट इरफान पठाणनं केल्यामुळे नेमकं या दोघांनी एकमेकांना काय वचन दिलं होतं? याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले.
इरफानच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे खुलासा!
दरम्यान, एक्सवर फोटो पोस्ट करणाऱ्या इरफाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यातून या प्रसंगाबाबत खुलासा झाला आहे. “त्यानं त्याचं वचन पूर्ण केलं” असं व्हिडीओवर लिहिलं आहे. तर पोस्टमध्ये “…आणि मी माझं वचन पूर्ण केलं. राशिद खाननं मला सांगितलं होतं की ते पुन्हा जिंकतील आणि मी त्याला म्हणालो होतो की असं झालं तर मी पुन्हा नाचेन”, असं इरफाननं लिहिलं आहे.
व्हिडीओमध्ये काय?
इरफान पठाणनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं अफगाणिस्तानच्या विजयानंतर काय घडलं हे दिसत आहे. अफगाणिस्तानचा संघ विजयानंतर उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करत असताना समोर इरफान पठाण दिसला. त्यावेळी समोरून येणाऱ्या राशिद खानला बघताच इरफान पठाणनं नाचायला सुरुवात केली. त्यानंतर राशिदची गळाभेट घेऊन त्याला विजयासाठी शुभेच्छाही दिल्या.
PAK vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला धोबीपछाड; ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय
सामन्याचं चित्र…
सोमवारी पाकिस्ताननं पहिली फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २८३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. उत्तरादाखल अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या तिखट गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढत हे आव्हान लीलया पूर्ण केलं. तब्बल ८ विकेट्स राखून अफगाणिस्ताननं पाकिस्तानला नमवलं आहे. हा यंदाच्या विश्वचषकातला तिसरा धक्कादायक निकाल ठरला आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननंच गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला पराभवाचं पाणी पाजलं. दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सनं बलाढ्य दक्षिण आफ्रिलेकाला आस्मान दाखवल्यानंतर आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या संघानं धक्कादायक निकाल नोंदवला आहे.