क्रिकेट आणि समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने इरफान आणि युसूफ या दोन्ही पठाण बंधूंनी ‘क्रिकेट अकादमी ऑफ पठाणस्’ची स्थापना केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पहिली अकादमी बडोद्यामध्ये सुरू होणार असली, तरी यापुढे भारतातील गावागावांमध्ये अकादमी सुरू करायचा त्यांचा निर्धार आहे. आम्हाला बालपणी जे मिळू शकले नाही, ते देशातील लहान मुलांना मिळायला हवे, असे इरफानने यावेळी सांगितले. अकादमीच्या घोषणेच्या निमित्ताने इरफानने ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत-
*या अकादमीची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली?
गेली १५ वर्षे मी क्रिकेट खेळतो आहे. स्थानिक क्रिकेटबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जावर बरेच क्रिकेट खेळलो आणि यामधून बरेच काही शिकत गेलो. बालपणी आम्हाला कोणत्याच सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, पण आताच्या लहान मुलांना या सोयी-सुविधा मिळाव्यात, हा यामागचा हेतू होता. त्याचबरोबर लहानपणी आम्ही शाळेतून बरेच लांब क्रिकेट खेळण्यासाठी जायचो. त्यामुळे जर शाळेमध्येच क्रिकेट शिकायला मिळाले तर वेळ आणि शक्ती नक्कीच वाचेल. क्रिकेट आणि समाजाने आम्हाला बरेच काही दिले आहे, त्यांचे देणे आम्ही लागतो, त्याचीच ही परतफेड आहे.
*शाळांमध्ये नेमक्या कुठल्या पायाभूत सुविधा तुम्हाला हव्या आहेत?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैदान. ज्या शाळांकडे चांगले मैदान असेल तिथे आम्ही अकादमी सुरू करू. मैदानामध्ये आम्ही टर्फची खेळपट्टी बनवणार आहोत. आम्ही स्वत: मुलांना शिकवणार नसलो तरी त्यांच्या कामगिरीवर नक्कीच आमचे लक्ष असेल.
*क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हटला जातो, या अकादमीमध्ये क्रिकेटच्या सभ्यतेचे धडे देण्यात येणार आहेत का?
नक्कीच. क्रिकेटमध्ये खेळाबरोबर या साऱ्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. आम्ही दोघेही भाऊ गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळत आहोत. आतापर्यंत आमच्याकडून अशोभनीय वर्तन पाहायला मिळालेले नाही आणि तसे होणारही नाही. आम्ही या अकादमीमध्ये शिकवणार नसलो, तरी या साऱ्या गोष्टी आम्ही लहान मुलांना नक्कीच सांगणार आहोत आणि आमच्याकडे बघून आमच्यासारखीच मुले या अकादमीमध्ये येतील.
*शहरांप्रमाणे गावांमध्ये अकादमी दिसत नाहीत, तुम्ही बडोद्यानंतर भारतातील गावांमध्ये अकादमी स्थापन करणार का?
होय, बडोद्यामध्ये आम्ही पहिली अकादमी सुरू करणार असून त्यानंतर २०१५पर्यंत पन्नास अकादम्या आम्हाला भारतामध्ये उभारायच्या आहेत. त्यामुळे शहरांबरोबरच छोटय़ा गावांमध्येही आम्ही नक्कीच अकादमी स्थापन करणार आहोत. काही गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलत आहोत. अकादमीचा विस्तार जसा वाढेल, त्याप्रमाणे गरीब घरांतील मुलांनाही आम्ही अकादमीमध्ये प्रवेश देण्याचा विचार करत आहोत.
*अकादमीच्या मुख्य मार्गदर्शकासाठी तुम्ही ग्रेग चॅपेल यांचीच का नियुक्ती केली, या पदासाठी तुम्ही भारतीय प्रशिक्षकांचा विचार का केला नाही?
दोन-तीन नावांचा आम्ही विचार केला. पण ग्रेग यांच्या मार्गदर्शनाखाली मी खेळलो आहे. त्याचबरोबर लहान मुलांना ते कसे समजावतात, हेदेखील पाहिले आहे. त्यामुळेच आम्ही ग्रेग यांना या पदावर नियुक्त केले. पण ग्रेग यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षक काम करतील, ते फक्त आणि फक्त भारतीयच असतील. क्रिकेटच्या माध्यमातून भारताचा विकास व्हायला हवा, हेच आमचे ध्येय आहे.
*विश्वचषक आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तुझी भारतीय संघात पुनरागमनासाठी कशी तयारी सुरू आहे?
स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले जाते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटवर मी लक्ष केंद्रित केले आहे. अथक मेहनत, दमदार कामगिरी आणि जिद्दीच्या जोरावर मी नक्कीच संघात पुनरागमन करेन, पण ते विश्वचषकाच्या पूर्वी होईल की नंतर हे मला सांगता येणार नाही.

Story img Loader