आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी मुंबई आणि दिल्ली पोलीसांकडून सुरू असताना संघांच्या मालकांना ‘क्लीन चीट’ देणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कायदा आणि संविधानापेक्षा मोठी आहे का, असा सवाल माजी क्रिकेटपटू आणि संसदपटू कीर्ती आझाद यांनी विचारला आहे.
रविवारी बीसीसीआयच्या द्विसदस्यीय समितीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांसहित त्यांच्या मालाकांनाही ‘क्लीन चीट’ दिली होती. याबद्दल बोलताना आझाद म्हणाले की, यासाठी मी जगमोहन दालमिया किंवा एन. श्रीनिवासन यांना दोषी ठरवणार नाही. काही राजकारणी बीसीसीआयला फार मोठे बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जसे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (आयओए) करण्यात आले होते. पण आयओएचे काय झाले हे आपण पाहिले आहे. राजकारण्यांमुळे जशी आयओएची वाताहत झाली, तशीच आता बीसीसीआयचीही होऊ शकते.
ते पुढे म्हणाले की, आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, तर दिल्ली पोलिसांचाही याबाबतीतला तपास सुरू आहे आणि असे असताना बीसीाीआय ‘क्लीन चीट’ देणारी कोण? बीसीसीआय कायदा आणि संविधानापेक्षा मोठी आहे का, असा सवाल विचारतानाच सरकारने बीसीसीआयला माहिती अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली आणावे, जेणेकरून बीसीसीआयच्या व्यवहारात अधिक स्पष्टता येईल, असे त्यांनी सांगितले.
कायदा आणि संविधानापेक्षा बीसीसीआय मोठी आहे का?
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी मुंबई आणि दिल्ली पोलीसांकडून सुरू असताना संघांच्या मालकांना ‘क्लीन चीट’ देणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कायदा आणि संविधानापेक्षा मोठी आहे का,
First published on: 30-07-2013 at 06:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is bcci bigger then the law and the constitution