India vs Afghanistan 1st T20 Match: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला गुरुवारपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर यांची संघात निवड झालेली नाही. अलीकडेच, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की, बीसीसीआय या दोन्ही खेळाडूंवर नाराज आहे. मात्र राहुल द्रविडने सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहाली येथे होणाऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, या दोन्ही फलंदाजांची संघात निवड न झाल्याबद्दल त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर द्रविड म्हणाला, “गेल्या काही वर्षांत आयसीसीच्या अनेक स्पर्धा झाल्या, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. सर्वच खेळाडूंना सर्व फॉरमॅटमध्ये खेळवणे शक्य नाही. गेल्या वर्षी आम्ही एकदिवसीय विश्वचषकाला प्राधान्य दिले होते आणि आता आम्ही टी-२० विश्वचषकाकडे लक्ष देत आहोत.”

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: विराट कोहली बनणार रोहितचा सलामीचा जोडीदार? जाणून घ्या अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची रणनीती

अलीकडेच, रिपोर्ट्सनुसार, इशान किशन मानसिक थकवा आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचे कारण देत ब्रेकवर गेला होता, परंतु दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, द्रविडने याला नकार दिला. द्रविड म्हणाला, “इशान किशन स्वतः निवडीसाठी उपलब्ध नव्हता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने विश्रांतीची मागणी केली होती, त्यानंतर बीसीसीआयने त्याची मागणी पूर्ण केली. इशानने स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करून दिले नाही.”

दुसरीकडे त्याचवेळी, श्रेयस अय्यरबद्दल अशा चर्चा होत्या की त्याने देशांतर्गत संघात खेळण्याचा बोर्डाचा निर्णय नाकारला आणि विश्रांती मागितली. मात्र, अनेक चांगले फलंदाज आहेत त्यामुळेच त्याचा समावेश होऊ शकला नाही, असे द्रविडने आपल्या त्याच्या पत्रकार परिषदेतही म्हटले आहे. तो म्हणाला, “श्रेयस अय्यरसाठी कोणतेही शिस्तभंगाचे कारण आहे असे मला वाटत नाही. ही अशा प्रकारची अफवा पसरवणे दुर्दैवी आहे कारण तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे, पण त्याच्यासारखे अनेक फलंदाज सध्या संघात आहेत. काहीवेळेस सर्वच खेळाडूंना संघात स्थान देता येत नाही, रोटेशन पॉलिसीनुसार निर्णय घ्यावे लागतात.”

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली पहिला टी-२० खेळणार नाही, द्रविडचा पत्रकार परिषदेत खुलासा

इशान किशनने नेमकं काय केलं आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिस्तभंगाच्या कारणास्तव इशान किशनची संघात निवड झालेली नाही. एका बंगाली वृत्तपत्राने दावा केला आहे की, “निवडकर्ते इशान किशनच्या वृत्तीवर नाराज होते. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग होता, पण वैयक्तिक कारणांमुळे मालिकेच्या काही दिवस आधी तो मायदेशी परतला होता. यानंतर इशान किशन माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर पार्टी करताना दिसला. याशिवाय तो एका टीव्ही क्विझ शोमध्येही दिसला होता. याच कारणामुळे त्याची निवड झालेली नाही.”

अय्यरला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले

जर आपण श्रेयस अय्यरबद्दल बोललो तर निवडकर्ते त्याच्या शॉट खेळण्याच्या निवडीवर नाराज आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेदरम्यान त्याची शॉट सिलेक्शन खूपच खराब होती. याच कारणामुळे निवडकर्त्यांनी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले आहे. १२ जानेवारीपासून आंध्र प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई संघात अय्यरचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, जे खेळाडू कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला गांभीर्याने घेत नाहीत त्यांच्याशी कठोरपणे वागण्याचे निवड समितीने ठरवले आहे. रिंकू सिंगच्या मेहनतीमुळे निवड समिती प्रभावित झाली असून लवकरच त्याचा कसोटी संघात समावेश होऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is bcci really angry with ishan kishan and shreyas iyer rahul dravid replied avw