भारताचा सलामीवीर रोहित शर्माला भारतापेक्षा ‘आयपीएल’मध्ये खेळणे अधिक महत्त्वाचे आहे का, असा प्रश्न माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केला आहे. दुखापतीबाबत संभ्रम कायम असतानाही रोहित मंगळवारी ‘आयपीएल’मधील सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत खेळताना आढळल्याने वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
३३ वर्षीय रोहितला पायाच्या दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान लाभले नाही. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीसुद्धा रोहितला जोखीम न पत्करण्याचा सल्ला दिला होता. तरीही रोहित मात्र आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगत हैदराबादविरुद्धच्या लढतीत खेळला.
‘‘ज्या खेळाडूला काही दिवसांपूर्वीच ‘बीसीसीआय’ने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यातून वगळले. तोच खेळाडू ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरतो, यावरून काय सिद्ध होते. रोहितसारख्या परिपक्व खेळाडूच्या अशा वागण्यावरून त्याला देशापेक्षा ‘आयपीएल’ अधिक महत्त्वाची आहे का, असा प्रश्न मनात येतो, त्यामुळे ‘बीसीसीआय’ने यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा,’’ असे वेंगसरकर म्हणाले. त्याशिवाय ‘बीसीसीआय’चे फिजिओ नितीन पटेल यांनी रोहितच्या तंदुरुस्तीचा आढावा घेण्यात काही चूक तर केली नाही ना, याचीही पडताळणी करावी, असेही वेंगसरकर यांनी सुचवले.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या साखळी लढतीत डाव्या पायाच्या माडींचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीसुद्धा भारतीय संघात त्याचा विचार करण्यात आला नाही. २७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ होईल.