Champions Trophy 2025: भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकलं. मात्र पराभवासह यजमान पाकिस्तानचा प्रवास प्राथमिक फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. पाकिस्तानला सेमी फायनल प्रवेशासाठी आता गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानला हरवलं. न्यूझीलंडने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानचा रनरेटच्या मुद्यावर पिछाडीवर गेलं. घरच्या मैदानावर पराभवाला सामोरं गेलेल्या पाकिस्तानच्या संघाने प्रवास करून दुबई गाठलं. या मैदानावर खेळण्याचा त्यांच्या खेळाडूंना अनुभव होता पण भारतीय संघ खणखणीत खेळ करत पाकिस्तानला हरवलं. दोन लढतीत दोन पराभव झाल्याने पाकिस्तानच्या बाद फेरीच्या आशा मावळत चालल्या आहेत. पाकिस्तानचा नेटरनरेट उणे १.०८७ इतका आहे. अ गटात ते चौथ्या स्थानी आहेत.
सोमवारी न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात मुकाबला होणार आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात येऊ शकते. बांगलादेशने विजय मिळवल्यास पाकिस्तानच्या आशा जिवंत राहतील. २७ फेब्रुवारीला पाकिस्तान-बांग्लादेश सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास पाकिस्तानचे २ गुण होऊ शकतात. मोठ्या फरकाने सामना जिंकल्यास त्यांचा रनरेट सुधारू शकतो. यानंतर भारताने न्यूझीलंडला हरवलं तर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी २ गुण होतील. ज्या संघाचा नेटरनरेट चांगला असेल तो संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. मात्र ही सगळी गणितीय समीकरणं आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे संघ दमदार फॉर्मात आहेत. सोमवारी न्यूझीलंडने बांगलादेशला हरवल्यास पाकिस्तानला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागू शकतो.
१९९६ साली भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. त्यानंतर जवळपास ३० वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी स्पर्धेचं आयोजन होत आहे. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने भारताचे सामने दुबईत होत आहेत.