भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झालेला. अपघातानंतर जानेवारी महिन्यात ऋषभवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ऋषभला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अशातच ऋषभने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या पायांवर प्लास्टर असल्याचं दिसत आहे.
ऋषभने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या उजवा पाय अजूनही सुजलेला दिसत आहे. त्यामुळे तो कुबड्यांच्या साह्याने चालण्याचा प्रयत्न करतोय. पंतने शेअर केलेल्या या फोटोवर “एक पाऊल पुढे… एक पाऊल मजबूत… एक पाऊल उत्तम…” असं कॅप्शन दिलं आहे.
ऋषभच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ऋषभची गर्लफ्रेंड ईशा नेगीनेही त्यावर कमेंट केली आहे. ईशा नेगीने ऋषभला “लढाऊ” म्हटलं आहे. तसेच, हार्टची इमोजीही टाकली आहे. ३० डिसेंबरला ऋषभचा अपघात झाल्यानंतर एक महिना ईशा नेगी समाज माध्यमांवर सक्रिय नव्हती.
दरम्यान, ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. भारतात झालेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरोधातील झालेल्या सामन्यांमधून ऋषभ पंत बाहेर होता. तसेच, आशिया कप आणि आयपीएलमध्येही ऋषभ पंत बाहेर राहण्याची शक्यता आहे.
कसा झाला होता अपघात?
ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्ली ते डेहराडून असा कारने प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्या कारला भीषण अपघात झाला. त्याची बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकली. ही दुर्घटना घडल्यानंतर पंत कसा-बसा कारमधून बाहेर पडला. मात्र, काही मिनिटांतच गाडीने पेट घेतला, यामध्ये पंतची कार जळून खाक झाली. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली होती. मागील अनेक दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो अपघातातून सावरत आहे.