मुंबई : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी तंदुरुस्तीवर मेहनत घेण्यासाठी पुढील आठवडय़ात बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल होणार आहे.भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ ३ जुलैला वेस्ट इंडिजला रवाना होणे अपेक्षित असून पहिल्या कसोटीला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत किशनला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकेल. या वर्षी मायदेशात झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी किशनला भारतीय चमूत स्थान मिळाले होते.
मात्र, त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. केएस भरतला संधी मिळाली, पण त्याला अपयश आले. त्यामुळे आता विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी किशनला भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकेल. त्या दृष्टीने तो ‘एनसीए’मध्ये तंदुरुस्तीवर मेहनत घेणार आहे.‘‘गेल्या डिसेंबरपासून इशान सातत्याने भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यानंतर मायदेशात परतल्यावर त्याने काही दिवस विश्रांती घेतली. तो पुढील आठवडय़ात ‘एनसीए’मध्ये जाणार असून तेथे वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीला सुरुवात करणार आहे,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.