भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने शानदार द्विशतक झळकावले. यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने बॅटने कमाल केली. सध्या इशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. इशान किशनशिवाय धोनीचे चाहतेही हा व्हिडिओ पाहून इशान किशनचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, इशान किशनने मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने अवघ्या १२६ चेंडूत २०० धावांचा आकडा गाठला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. द्विशतक ठोकणारा किशन हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी ही किमया साधली होती. द्विशतक झळकावल्यानंतर इशान किशन प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने अलीकडेच वन क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खेळीचे श्रेय मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला दिले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडून खूप काही शिकता आले असे किशनने म्हटले.
इशानने चाहत्यांची मने जिंकली
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इशान किशन एका चाहत्यासोबत दिसत आहे. त्याच्या चाहत्याने मोबाईलमध्ये ऑटोग्राफ देण्याची मागणी केली. ऑटोग्राफ देण्यासाठी किशन मोबाईल हातात घेतो, पण तेव्हाच त्याला दिसले की त्या फोनवर धोनीची सही देखील आहे. किशनने धोनीच्या ऑटोग्राफवर ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. माही भाईच्या स्वाक्षरीवर ऑटोग्राफ देण्याइतके माझे वय नाही, असे तो म्हणतो. यानंतर ईशान किशन खाली ऑटोग्राफ देतो.
या घटनेचा व्हिडिओ एका चाहत्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेव्हापासून इशान किशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे जोरदार कौतुक होत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की किशनला वरिष्ठ खेळाडूंचा आदर कसा करायचा हे माहित आहे आणि त्याची ही सवय त्याला मोठा खेळाडू झाल्यावर मदत करेल.
याशिवाय भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलताना इशान किशनने सर्वांची मनं जिंकली. “एमएस धोनीने आम्हाला विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. तो एक महान खेळाडू आहे, जरी मी एमएसने जे काही केले त्यातील ७०% जरी केले तरी मला आनंद होईल”, अशा शब्दांत किशनने धोनीचे कौतुक केले. तर ईशानने भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे कौतुक करताना म्हटले “वीरेंद्र सेहवागला खेळताना पाहून मी गोलंदाजांना टार्गेट करायला शिकलो. कारण तो ब्रेट ली असो किंवा शोएब अख्तर सगळ्यांविरूद्ध आक्रमक खेळायचा.”