वृत्तसंस्था, पोर्ट ऑफ स्पेन
भारतीय संघाने मोठी आघाडी मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला आक्रमक शैलीत खेळण्याची संधी मिळाली. किशनने या संधीचे सोने करताना केवळ ३३ चेंडूंत कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारले. विशेष म्हणजे किशनने या खेळीदरम्यान ऋषभ पंतची बॅट वापरली.
कार अपघातात जखमी झालेल्या पंतला या वर्षी क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत विंडीज दौऱ्यामध्ये किशनला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. किशनला कसोटी कारकीर्दीतील पहिल्या दोन डावांत अपयश आले. मात्र, तिसऱ्या डावात त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी मिळाली आणि त्याने फटकेबाज अर्धशतक झळकावले. त्याने केमार रोचच्या गोलंदाजीवर षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. मात्र, यावेळी त्याचा एक हात बॅटवरून सटकला. पंत एका हाताने षटकार मारण्यासाठी ओळखला जातो आणि किशनच्या षटकारामुळे चाहत्यांना पंतची आठवण झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर किशनने आपल्या खेळीचे श्रेय पंतलाच दिले.
‘‘विंडीज दौऱ्यावर येण्यापूर्वी मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) होतो. मी तेथे सराव करत होतो आणि ऋषभ दुखापतीवर उपचार घेत होता. त्याने मला काही सल्ले दिले. आम्ही एकत्रित बरेच क्रिकेट खेळले आहे. आम्ही १९ वर्षांखालील संघापासून एकमेकांना ओळखतो. त्यामुळे माझी खेळण्याची शैली, माझी मानसिकता त्याला ठाऊक आहे. फटके मारताना मी बॅट कशी पकडायला हवी, बॅटची दिशा कुठे हवी, याबाबत ऋषभने मला काही गोष्टी सांगितल्या. त्याचा मला खूप फायदा झाला आहे. त्याने मला योग्य वेळी सल्ला दिला, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे,’’ असे किशन म्हणाला.
पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय
भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ वेळेवर सुरू होऊ शकला नाही. त्यापूर्वी चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव २ बाद १८१ धावांवर घोषित करत विंडीजपुढे ३६५ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर विंडीजची २ बाद ७६ अशी स्थिती होती. रविचंद्रन अश्विनने विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (२८) आणि कर्क मकेन्झी (०) यांना बाद केले.