भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी २० मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. तीन सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी ट्वेंटी क्रमवारीत ६८ स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी २० आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत ईशान किशनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो टी २० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १०जणांच्या यादीमध्ये प्रवेश करू शकला. पहिल्या १० फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे १६व्या आणि १७व्या स्थानावर आहेत. माजी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांनी घसरून २१व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजी क्रमवारीमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची सात स्थानांनी सुधारणा झाली आहे. तो सध्या ११व्या स्थानावर पोहचला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलने चार स्थानांनी प्रगती करत २६वे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने टी २० गोलंदाजी पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे.

हेही वाचा – ENG vs NZ: नॉटिंगहॅम कसोटीमध्ये पडला चौकार-षटकारांचा पाऊस, प्रेक्षकांना मिळाला टी २० सामन्याचा अनुभव

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर, इंग्लंडच्या जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावून अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानांवर टिकून आहेत.