बांगलादेशमध्ये पुढील वर्षी २७  जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. दिल्लीचा डावखुरा फलंदाज रिशभ पंतकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. व्यंकटेश प्रसादच्या नेतृत्वाखालील कुमार निवड समितीने या संघाची घोषणा केली.

तीन वेळा युवा विश्वचषक विजेत्या भारताचा ‘ड’ गटात समावेश करण्यात आला असून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नेपाळ हे अन्य तीन संघ असतील. मिरपूर येथे २८ जानेवारीला भारताची सलामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या तिरंगी स्पध्रेत भारताच्या युवा संघाने श्रीलंकेला नमवून विजेतेपद काबीज केले होते. भारताची दुसरी लढत ३० जानेवारीला न्यूझीलंडशी आणि तिसरी लढत १ फेब्रुवारीला नेपाळशी होणार आहे. या स्पध्रेचा अंतिम सामना १४ फेब्रुवारीला होणार आहे.

भारतीय संघ : इशान किशन (कर्णधार), रिशभ पंत (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सर्फराझ खान, अमनदीप खरे, अनमोलप्रीत सिंग, अरमान जाफर, रिकी भुई, मयांक दगर, झीशान अन्सारी, महिपाल लोम्रोर, आवेश खान, शुभम मावी, खलीद अहमद आणि राहुल बाथम.

Story img Loader