Ishan Kishan on West Indies Tour: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन आणि बीसीसीआयचे काही केंद्रीय करार असलेले खेळाडू पुढील आठवड्यात बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा भाग असतील. हे खेळाडू त्यांच्या ताकद आणि खेळातील तंत्रावर काम करतील तसेच, वेस्ट इंडिजच्या परिस्थितीनुसार स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करतील. येथे पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर हे खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत.
भारत १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे, ज्यासाठी टीम इंडिया ३ जुलैला वेस्ट इंडिजला रवाना होईल. साधारणपणे, जेव्हा दोन आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये अंतर असते, तेव्हा केंद्रीय करार असलेले खेळाडू आणि पुढील मालिकेसाठी संघात निवडले जाणारे आणि कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेचा भाग नसलेले खेळाडू यांना राष्ट्रीय क्रिकेट सराव शिबिरात (NCA) जावे लागते. येथे त्यांच्या फिटनेसचे मूल्यांकन केले जाते आणि आगामी दौऱ्यासाठी त्यांना तयार केले जाते.
२८ जूनपासून बंगळुरू येथे होणारी दुलीप ट्रॉफी फायनल १२ ते १६ जुलै दरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाईल. बंगळुरूमधील अलूर येथे पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत पूर्व विभागाचा मध्य विभागाशी सामना होईल. २४ वर्षीय इशान किशनला भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी पूर्व विभागाकडून सामना खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र त्याने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशनने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, “दुलीप ट्रॉफी खेळण्यापेक्षा मी एनसीएमध्ये जाणार आहे आणि तिथे सराव करणार आहे.”
ऋषभ पंतला दुखापत झाल्यानंतर के.एस. भरतने भारतीय कसोटी संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु फलंदाजीत सातत्याने त्याने निराशा केली आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला देशांतर्गत सामन्यात चांगली कामगिरी करून भारतीय कसोटी संघासाठी पहिला सामना खेळण्याची संधी होती, मात्र त्याने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही इशान किशनकडे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाहिले जात होते, पण त्याला संधी मिळाली नाही.
आता त्याने दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या या निर्णयामुळे कसोटी क्रिकेट आणि भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल नक्कीच प्रश्न निर्माण होतात. मात्र, भारतीय कसोटी संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून त्याच्या स्थानाला आव्हान देणारे सध्या कोणी नाही. अशा स्थितीत त्यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड जवळपास निश्चित आहे.
इशान किशनच्या जवळच्या सूत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “गेल्या डिसेंबरपासून इशान भारतीय संघाचा नियमित भाग आहे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर इंग्लंडमधून परतल्यावर त्याने थोडा ब्रेक घेतला. तो पुढील आठवड्यात परत येईल. सुरुवातीच्या दिवसांत तो एनसीएमध्ये असेल आणि त्याच्या प्रशिक्षणावर आणि वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये तो सहभागी होण्याची अपेक्षा आहे.”
वर्कलोडच्या प्रश्नावर अनेकांनी सांगितले की, जर इशानची कसोटी संघात निवड झाली नाही तर तो दोन महिने एकही सामना न खेळता वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेचा भाग असेल. त्याचा शेवटचा सामना २६ मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होता. जर त्याची कसोटी खेळण्यासाठी संघात निवड झाली नाही, तर तो थेट वन डे मालिका खेळेल. २७ जुलै पासून बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिकेला सुरुवात होईल.