वेगवान गोलंदाज इशांत शर्माने गोलंदाजांच्या आणि चेतेश्वर पुजाराने फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल विसांमध्ये मजल मारली आहे. भारताने तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका  जिंकण्याची किमया साधली.
‘‘चेतेश्वर पुजाराने झुंजार खेळी साकारल्यामुळे कोलंबोच्या कसोटीत तिसऱ्या कसोटीत भारताने ११७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेवर २-१ अशा फरकाने प्रभुत्व मिळवले. त्यामुळे पुजाराने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत प्रथमच अव्वल विसांमध्ये स्थान मिळवले आहे,’’ असे आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
२७ वर्षीय पुजाराने कठीण परिस्थितीत हिमतीने खेळताना नाबाद १४५ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३१२ धावा उभारता आल्या. त्याने चार स्थानांनी आगेकूच करून २०व्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली ११व्या स्थानावर आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. याचप्रमाणे रोहित शर्मा ४८व्या (२ स्थानांनी आगेकूच), रविचंद्रन अश्विन ५०व्या (५ स्थानांनी आगेकूच), तर अमित मिश्रा ९१व्या (५६ स्थानांनी आगेकूच) स्थानावर आहे.
कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल दहा जणांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. तिसऱ्या कसोटीत ८६ धावांत ८ बळी घेणाऱ्या इशांतने आपल्या कसोटी कारकीर्दीतील २०० बळींचा टप्पा या वेळी गाठला. त्याने तीन स्थानांनी क्रमवारीत सुधारणा करून १८वे स्थान गाठले आहे.
मिश्राने ३७व्या आणि उमेश यादवने ४२व्या स्थानावर मजल मारली आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजीच्या त्रिकुटापैकी धम्मिका प्रसाद २२व्या (३ स्थानांनी आगेकूच), न्यूवान प्रदीप ५७व्या (१२ स्थानांनी आगेकूच) आणि अँजेलो मॅथ्यूज ७१व्या (२ स्थानांनी आगेकूच) स्थानांवर मजल मारली आहे.

Story img Loader