आखूड टप्प्याचे उसळते चेंडू अंगावर येत आहेत आणि अस्थिर व अधीर फलंदाज आडव्या बॅटचे, मुख्यत: पूलचे फटके चालवीत आहेत आणि लेग स्लिपपर्यंत सहज झेपावणाऱ्या यष्टीरक्षकापासून डीप स्क्वेअर लेग, मिडविकेट व डीप मिड-विकेट या पट्टय़ात हे फटके व्यवस्थित झेलले जात आहेत..
ही दृश्ये सहसा भारतीयांना भेडसावणारी. आडव्या बॅटपेक्षाही सरळ वा किंचित तिरकस रेषेत बचावात्मक पवित्र्यात बॅट वापरणाऱ्या भारतीय फलंदाजांची तारांबळ खूपच केविलवाणी दिसायची. अन् उसळत्या चेंडूंचे घाव, करोडो भारतीयांना घायाळ करीत आले आहेत.
पण २०१४च्या २१ जुलैची, क्रिकेटच्या पंढरीतील ती दृश्ये वेगळ्याच परिस्थितीचे चित्रण करीत होती. बचावाच्या तंत्रास रामराम ठोकून अवेळी अनावर आक्रमणाचा आसरा घेणारे फलंदाज, इशांत शर्माच्या सापळ्यात पटापट सापडत होते व भारतीय प्रेक्षकांना उत्तेजित करीत होते. इशांत शर्माला पुनर्जन्म देत होते. परदेशातल्या १५ अपयशी कसोटींनंतर भारताला संजीवनी देत होते. नुकतेच श्रीलंकेकडून मार खाणाऱ्या इंग्लंडला आता भारताविरुद्ध पराजयाच्या खाईत लोटत होते.
वादग्रस्त पंच कुमार धर्मसेना यांच्या मेहेरबानीमुळेच चौथ्या दिवसअखेरीस नाबाद राहिलेला मोईन अली व दर्जेदार जो रूट ही पाचवी जोडी फुटेना. ३१९ धावांचे लक्ष्य. अन् निम्म्यापेक्षा अधिक मजल मारलेली, अशा परिस्थितीत संघनायक धोनीने इशांतला चेंडू आपटायचे आदेश दिले, पण इशांतचा राऊंड द विकेट रोख चुकला आणि उजव्या यष्टीबाहेरच्या त्या चेंडूंना रूटने ऑफला त्रिवार सीमापार धाडले. क्षेत्ररचनेशी विसंगत माऱ्याचा फायदा रूटने छान उठविला. पण अशा या माऱ्याची मात्रा डावखुऱ्या मोईन अलीला अचूक लागू पडली. अंगावर येणाऱ्या चेंडूला नजरेत ठेवण्यात त्याने कसूर केली व बैठक मारली. त्याच्या ग्लोव्हजला लागून चेंडू गेला शॉर्ट लेगवरील पुजाराच्या हाती.
बॅट आडवी चालवली
मग हेच डावपेच इशांतने व त्याला एक षटक साथ देणाऱ्या मोहम्मद शमीने चालविले. त्यांच्या दोन षटकांत २० धावा फटकावल्या गेल्या, पण भारताचे नशीब बलवत्तर की, अशा अवस्थेत हमखास बचावाकडे झुकणाऱ्या कर्णधार धोनीने शमीच्या जागी जाडेजाला आणले. तरी इशांतला आणखी एक षटक उसळते चेंडू सोडण्याची मुभा दिली. तिथून सुरू झाली, पूलच्या फटक्यासाठी आडवी बॅट चालविणाऱ्या इंग्लिश पलटणीची हाराकिरी. मिड-विकेटच्या सीमेजवळ प्रायरचा झेल विजयने पकडला. तर रूटचा पूल बिन्नीने झेलला डीप स्क्वेअर लेगला. दरम्यान, स्टोक्सचा कच्चा फटका मिडविकेटला पुजाराने झेलला. त्या झेलांना जोड मिळाली लेगला दहा फूट आरामात सरकत यष्टीरक्षक धोनीने टिपलेल्या सोप्या झेलाची.
छातीचा व तोंडाचा वेध घेत घोंगावत येणारे चेंडू फलंदाजांना जरूर नाचवतात. अशा दहशतवादी माऱ्यापासून सर्वप्रथम शरीराचे रक्षण करण्यासाठी फलंदाजाची बॅट उभ्या सरळ रेषेत राहते. अशा वेळी फलंदाज टिपले जातात ते गलीत, स्लिपच्या साखळीत वा लेग-स्लिप ते सिली मिडऑनच्या साखळीत. इशांतच्या माऱ्यात ती क्षमता क्वचितच होती, पण तरीही त्याला प्रचंड यश कसे मिळाले, ते कोडे इंग्लंडच्या प्रशिक्षकांना सोडवावे लागणार आहे.
१९३६मधील भारताच्या दुसऱ्या इंग्लिश दौऱ्यात अमर सिंग यांच्या तिखट मध्यमगती माऱ्याने सहा इंग्लिश फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याआधी चार वर्षांपूर्वी लॉर्डस्लाच त्यांनी इंग्लंडचे दोन-दोन फलंदाज गार केले होते. पण इशांत शर्मा व अमर सिंग यांच्यातील साम्य केवळ या आकडय़ांपुरतेच आहे. कारण अमर सिंग यांच्या दहा बळींपैकी निम्मे आहेत त्रिफळाचीत वा पायचीत. इशांतने त्रिफळा उडवला तो केवळ इयन बेलचा. हे सांगण्याचे कारण एवढेच की केवळ आकडेवारीच्या आधारे, दोघांना एकसारखे लेखले जाऊ नये. या तीन सामन्यांपुरते बोलायचे तर अमर सिंग यांची भेदकता इशांतमध्ये दिसत नाही; त्यांना एका पंगतीत बसवावं ते काही विशिष्ट आकडेवारीपुरते. बस्स!
सामनावीर भुवनेश्वरच!
..तरीही ही कसोटी इशांतला पुनर्जन्म  देणारी ठरावी. इशांत हा भारतीय गोलंदाजांपैकी सर्वात अनुभवी. साहजिकच त्याने प्रतिपक्षाला गुंडाळण्याची जबाबदारी उचलण्यास पुढे यावे, असं संघनायक धोनी वारंवार बोलून दाखवत होता. आपल्या पहिल्याच विदेशी दौऱ्यात, कांगारू कर्णधार रिकी पाँटिंगला भंडावून सोडणाऱ्या इशांतचे चेंडू पाँटिंगच्या बॅटपेक्षा पॅडवर थडकत होते, पण त्यानंतर त्या सुरुवातीस साजेशी कामगिरी तो सातत्याने करू शकला नाही. गतसाली ५०व्या कसोटीत खेळण्याच्या आनंदावर विरजण पाडले, त्याच्या कामगिरीने. पहिल्या पन्नास कसोटींतील त्याची सरासरी बऱ्याच साऱ्या भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत त्याला तळाला ठेवत होती.
लॉर्डस् कसोटीत सामनावीर कोण निवडला जावा? ७ बाद १४५ अशा खराब अवस्थेत, षटकात चार धावांच्या गतीने अप्रतिम शतक झळकवणारा आणि दुसऱ्या डावात आर्मगार्डला लागून गेलेल्या चेंडूवर झेलबाद ठरवलेला (पंच धर्मसेना हाय हाय!) अजिंक्य रहाणे? की दोन्ही डावांत आठव्या विकेटसाठी रहाणे व जाडेजा यांच्यासह ९० व ९९ धावांच्या झुंजार भागीदाऱ्या करणारा (स्वत:चा वाटा ३६ व ५२ धावांचा) व पहिल्या डावात सहा बळी घेणारा भुवनेश्वर कुमार? मला वाटते की भुवनेश्वरचे योगदान अतुलनीय आहे. पण १९८६मधील लॉर्डस्च्या विजयात दिलीप वेंगसरकरचा वाटा (नाबाद १२६ व ३३), कपिल देवपेक्षा (सामन्यात ६ बळी, म्हणजे चेतन शर्मापेक्षा एक कमी व रॉजर बिन्नीपेक्षा एक जास्त) नक्कीच मोठा होता. पण तेव्हा दिलीपला डावलले गेले व तितक्याच विनाकारण आता भुवनेश्वरला. या वाईटातून एक चांगली गोष्ट निघू शकेल. मनोबल खेचलेल्या इशांतला नवी उमेद मिळेल आणि त्याची गरज आहेच. कारण इंग्लिश फलंदाज पुन:पुन्हा अशी हाराकिरी करणार नाहीत.
विनू मांकड व २०१४!
लॉर्डस्वरील सर्वोत्तम भारतीय कामगिरी कोणती? गेल्या ८२ वर्षांतील १७ कसोटींतील दोन अपवादात्मक विजयांची. १९८६ व २०१४ ची. एका वेगळ्या दृष्टीने पाहिले तर या दोन सामन्यांपेक्षा मालिकेवर ठसा उमटवला विनू मांकड यांनी. सामना झाला एकतर्फी. दत्तू फडकर यांच्या पूर्वनियोजित सापळ्यात फसलेल्या लेन हटनना स्लिपमधील भरवशाच्या पॉली उम्रिगर यांनी जीवदान दिले. मग हटनची भरारी दीडशेवर. इंग्लंडने भारताला हरवले आठ विकेट राखून, पण त्या सामन्याचे वर्णन आजही केले जाते. ‘विनू मांकड यांचा’ सामना.
तेव्हा लॉर्डस्वर विनूभाईंनी काय केले, यापेक्षा काय करायचे बाकी ठेवले? पहिल्या डावात ७२ व दुसऱ्यात १८४ धावा, आणि दरम्यान ९७ षटकांत (त्यांतील ३६ निर्धाव!) २३१ धावांत पाच बळी. पण त्या कसोटीत संघनायक विजय हजारे वगळल्यास विनूभाईंना कुणाचीच चांगली साथ लाभली नाही, म्हणून ते ठरले शोकांतिकेतील नायक!
१९८६ व २०१४मधील भारतीय संघाकडे विनू मांकड यांसारखी असामान्य अष्टपैलुत्वाची कामगिरी दाखविणारा खेळाडू नव्हता. ८६च्या सामन्यात वेंगसरकरला साथ देण्यास मोहिंदर अमरनाथ (६९) होता. कपिलच्या तोडीचा मारा केला चेतन शर्मा व रॉजर बिन्नी आणि मणिंदरची दुसऱ्या डावातील २०.४-१२-९-३ ही आकडेवारी अद्भुत होती आणि आता धवन, कोहली, बिन्नी व दस्तुरखुद्द धोनी यांचेही दुहेरी अपयश सांभाळून घेण्यास पुढे धावले सात शिलेदार!
क्रिकेटच्या सांघिक खेळात तंबू एक वा दोन खांबी नकोच. विनूभाईंना सलाम करून म्हणू या , हवाय आजच्यासारखा सांघिक मिलाफ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा