भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आपल्या भेदक माऱ्याने तो गोलंदाजांना माघारी धाडतोच आहे, पण आपल्या जहरी शब्दांनी प्रतिस्पध्र्यानाही घायाळ करत आहे. सोमवारी त्याचे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धमिक्का प्रसाद यांच्याशी वाद झाला. रविवारीही इशांतचा कुशल परेरा आणि रंगना हेराथ यांच्याबरोबर वादविवाद झाला होता. या प्रकरणी सामनाधिकाऱ्यांनी त्याची ६५ टक्के सामन्याच्या मानधनातील रक्कम दंड म्हणून ठोठावली होती. त्यामुळे हा इशांत आहे अशांत, यावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करत असताना ७६ व्या षटकामध्ये इशांत फलंदाजी करत असताना धम्मिकाने त्याला दोन उसळते चेंडू टाकले, या वेळी इशांतने धम्मिकाला स्मित दिले. त्यानंतर तिसरा चेंडू धम्मिकाचा पाय रेषेच्या पुढे पडल्यामुळे पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर धम्मिकाच्या चेंडूवर इशांतने एक धाव घेतली. पण ही धाव घेत असताना इशांत धम्मिकाजवळ गेला आणि हेल्मेट दाखवून यावर चेंडू टाक, असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. धाव पूर्ण झाल्यावर धम्मिका इशांतजवळ गेला आणि त्यांच्या शाब्दिक द्वंद्व रंगायला सुरुवात झाली. इतक्यात दिनेश चंडिमलने इशांत टी-शर्ट खेचला. हे सारे प्रताप दुसऱ्या टोकावर असलेला आर. अश्विन पाहत होता आणि त्याने लगेचच रॉड टकर आणि नायजेल लाँग या पंचांना बोलवले आणि हा प्रकार दाखवला. पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला बोलावून हा प्रकार थांबवण्यास सांगितले. त्यानंतरच्या चेंडूवर अश्विनने एक धाव घेतल्यामुळे इशांत फलंदाजीला आला आणि धम्मिकाने त्याला उसळता चेंडू टाकला जो नियमांनुसार अवैध होता. पंचांनी तो नो-बॉल घोषित केला. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विन बाद झाला. त्या वेळी इशांत माघारी परतत असताना धमिक्का त्याच्या पाठोपाठ गेला आणि मैदानाबाहेरही त्यांच्यामध्ये वाक्युद्ध रंगले.

Story img Loader