लॉर्ड्सवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेले इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये बढती मिळाली आहे. त्याचबरोबर या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे आणि पाच धावांनी शतक हुकलेल्या मुरली विजयच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झाली आहे.
इशांतने दुसऱ्या डावात सात विकेट्स मिळवत क्रमवारीत तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच २०वे स्थान पटकावले आहे. भुवनेश्वरने क्रमवारीत १२ स्थानांची झेप घेत ३४वे स्थान गाठले आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत आर. अश्विन अकराव्या आणि रवींद्र जडेजा २८व्या स्थानावर आहेत.
मुरली विजयने क्रमवारीत ११ स्थानांची आगेकूच केली असून त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम असे १९वे स्थान पटकावले आहे. अजिंक्यच्या क्रमवारीत ११ स्थानांची सुधारणा झाली असून तो ३५व्या स्थानावर पोहोचला आहे.
फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली अनुक्रमे आठव्या आणि १४व्या स्थानावर आहेत.

Story img Loader