भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भेदक मारा करत तीनदिवसीय सराव सामन्यात श्रीलंका अध्यक्षीय संघाच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर भारताने अध्यक्षीय संघाचा पहिल्या डावात १२१ धावांत धुव्वा उडवता आला. दुसऱ्या डावात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद ११२ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण ३४२ धावांची आघाडी आहे.
शतकवीर अजिंक्य रहाणे दुसऱ्या दिवशी जखमी निवृत्त झाल्याने फलंदाजीला उतरू शकला नाही. या वेळी भारताने फक्त ३५ धावांची भर घातली आणि त्यांचा पहिला डाव ३५१ धावांमध्ये संपुष्टात आला. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अध्यक्षीय संघाच्या डावाला इशांतने खिंडार पाडले. अध्यक्षीय संघाच्या पहिल्या पाच फलंदाजांना फक्त दहा धावांमध्ये तंबूत धाडत इशांतने त्यांचे कंबरडे मोडले. यानंतर श्रीलंकेचा डाव सावरू शकला नाही. इशांतने कुशल परेराला शून्यावर बाद करत आपला पाचवा बळी मिळवला. मिलिंदा श्रीवर्धना (३२), निरोशन डिकवेला (४२) आणि धनुष्का गुनांथिलका (२८) या तिघांनाच फक्त दोन अंकी धावसंख्या उभारता आली आणि श्रीलंकेला शतकाची वेस ओलांडता आली. इशांतने ७ षटकांमध्ये २३ धावा देत ५ बळी मिळवले. वरुण आरोन आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी फक्त २८ धावांमध्ये तीन फलंदाज गमावले. पण त्यानंतर लोकेश राहुल (खेळत आहे ४७) आणि चेतेश्वर पुजारा (खेळत आहे ३१) यांनी डाव सावरला आणि दुसऱ्या दिवसअखेर संघाला ३ बाद ११२ अशी मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ८८.१ षटकांत सर्व बाद ३५१ (अजिंक्य रहाणे १०९ (जखमी निवृत्त), कसुन रजिथा ५/ ६८). (दुसरा डाव) : ४० षटकांत ३ बाद ११२ (लोकेश राहुल खेळत आहे ४७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ३१; विश्वा फर्नाडो २/१७). वि. श्रीलंका अध्यक्षीय संघ (पहिला डाव) : ३१ षटकांत सर्व बाद १२१ ( निरोशन डिकवेला ४२; इशांत शर्मा ५/२३).

Story img Loader