मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद घातल्याप्रकरणी भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मावर एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इशांत शर्मासह श्रीलंकेच्या धम्मिका प्रसाद, दिनेश चंडीमल आणि लाहिरू थिरीमाने यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) दोषी ठरवले आहे. सामना संपल्यानंतर या संदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे आयसीसीने ट्विटरवर स्पष्ट केले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धमिक्का प्रसाद याच्याशी इशांतचा सोमवारी वाद झाला होता, तर रविवारीही इशांतचा कुशल परेरा आणि रंगना हेराथ यांच्याबरोबर वादविवाद झाला. या प्रकरणी सामनाधिकाऱ्यांनी त्याची ६५ टक्के सामन्याच्या मानधनातील रक्कम दंड म्हणून ठोठावली होती. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करत असताना ७६ व्या षटकामध्ये इशांत फलंदाजी करत असताना धम्मिकाने त्याला दोन उसळते चेंडू टाकले, या वेळी इशांतने धम्मिकाला स्मित दिले. त्यानंतर तिसरा चेंडू धम्मिकाचा पाय रेषेच्या पुढे पडल्यामुळे पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर धम्मिकाच्या चेंडूवर इशांतने एक धाव घेतली. पण ही धाव घेत असताना इशांत धम्मिकाजवळ गेला आणि हेल्मेट दाखवून यावर चेंडू टाक, असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. धाव पूर्ण झाल्यावर धम्मिका इशांतजवळ गेला आणि त्यांच्या शाब्दिक द्वंद्व रंगायला सुरुवात झाली. त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करीत दोघांनाही ताकीद दिली होती. इशांत माघारी परतत असताना धमिक्का त्याच्या पाठोपाठ गेला आणि मैदानाबाहेरही त्यांच्यामध्ये वाक्युद्ध रंगले होते. त्यामुळे इशांतसह श्रीलंकेच्या खेळाडूंवर आयसीसीकडून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Story img Loader