Ishant Sharma Names Three Future Superstar Bowlers: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. यंदा इशांत शर्मा आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसला, ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे टीम इंडियातील वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे तर जुलैमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनेक युवा गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, इशांत शर्माने त्या तीन भारतीय वेगवान गोलंदाजांबद्दल सांगितले, ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात सुपरस्टार होऊ शकतात.
इशांत शर्माने ‘BeerBiceps’ या यूट्यूब चॅनलवर याबाबत चर्चा केली. भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “उमरान मलिकमध्ये देशासाठी दीर्घकाळ चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे, जर तुम्ही त्याच्यासोबत योग्य पद्धतीने काम केले. यात अर्शदीप सिंग हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.” त्याचवेळी इशांत शर्माने तिसरा गोलंदाज म्हणून दिल्ली कॅपिटल्सच्या मुकेश कुमारची निवड केली.
या तीन खेळाडूंना योग्य मार्गदर्शन हवे – इशांत शर्मा
मुकेशबद्दल बोलताना इशांत शर्मा म्हणाला, “बर्याच लोकांना त्याची कहाणी माहीत नाही, पण मी त्याच्यासारखा साधा माणूस कधीच पाहिला नाही. जर तुम्ही त्याला विशिष्ट चेंडू टाकण्यास सांगितले तर तो फक्त तोच चेंडू टाकतो. त्याला मैदानावर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, जेणेकरून दबावाच्या परिस्थितीत कोणता चेंडू टाकायचा हे त्याला कळू शकेल.”
गेल्या आयपीएलमध्ये मुकेश महागात का ठरला हे इशांत शर्माने सांगितले. मुकेश कुमारने आयपीएल २०२३ च्या १० सामन्यांमध्ये केवळ ७ विकेट घेतल्या, १० पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या. यावर इशांत म्हणाला, “आयपीएलमध्ये त्याच्याविरुद्ध धावा झाल्या. कारण त्याने अवघड षटके टाकली. त्याने कोणत्या परिस्थितीत गोलंदाजी केली किंवा कोणत्या फलंदाजासमोर गोलंदाजी केली हे कोणी पाहत नाही. त्याने ४ षटकात ५० धावा दिल्याचे सर्वांनीच पाहिले.”