भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरयाणाविरुद्ध येथे सुरू असलेल्या रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळताना तो शनिवारी मैदानावर येऊ शकला नाही. शुक्रवारी त्याने सहा षटके टाकल्यानंतर त्याला स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याबाबत कळू शकले नाही. सर्वसाधारणपणे अशा दुखापतीमधून तंदुरुस्त होण्यासाठी दोन ते सहा आठवडय़ांचा कालावधी लागतो. बेशिस्त वर्तनाबद्दल इशांतवर एका सामन्यासाठी बंदी असल्यामुळे तो जरी तंदुरुस्त झाला तरी त्याला पहिला कसोटी सामना खेळता येणार नाही. मात्र तो तंदुरुस्त झाला नाही तर त्याला दुसऱ्या कसोटीसही मुकावे लागेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड १९ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे.

Story img Loader