न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून तो भारतीय संघाकडून खेळू शकणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इशांची भारतीय संघात निवड झालेली होती, मात्र त्याचं संघात खेळणं हे फिटनेस टेस्टवर अवलंबून होतं. अखेरीस बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पार पडलेल्या फिटनेस टेस्टमध्ये इशांतने सर्व निकष पूर्ण करत आपलं कसोटी संघातलं स्थान पक्क केलं आहे.

बीसीसीआयमधील सुत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २१ फेब्रुवारी पासून दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना इशांतच्या पायाला दुखापत झाली होती. इशांतनेही ट्विट करत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फिजीओंचे आभार मानले आहेत.

३१ वर्षीय इशांत शर्माला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आपलं स्थान कायम राखता आलेलं नसलं तरीही कसोटी संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं स्थान अव्वल राखण्यात इशांतनेही मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत इशांत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.