वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहित शर्माने उर्वरित चार सामन्यांतून माघार घेतली आहे. त्यामुळे अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला अजमावण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
‘‘मोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली असून, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मायक्रोमॅक्स चषक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतून त्याने माघार घेतली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने त्याच्या जागी इशांत शर्माचा संघात समावेश केला आहे,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
भारताच्या कसोटी संघात नियमितपणे वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणारा इशांत जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. २०१५ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर इशांतला आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दाखवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
२६ वर्षीय इशांतकडे ५८ कसोटी व ७२ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव गाठीशी आहे. शुक्रवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील सराव सत्रात मात्र तो हजेरी लावू शकला नाही. याचप्रमाणे मोहम्मद शमीसुद्धा गैरहजर होता.

Story img Loader