भारताच्या वेगवान त्रिकुटाने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कमाल केली. इशांत शर्मा भारताच्या यशाचा सूत्रधार होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची बलाढय़ फलंदाजीची फळी अनपेक्षितपणे कोसळली आणि पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर सामन्यात रंगत आली आहे. नाटय़मय घडामोडींनी युक्त आणि गोलंदाजांचे हुकमी वर्चस्व गाजवणाऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा उर्वरित निम्मा संघ फक्त २५ धावांत गारद झाला आणि पाहुण्यांना पहिल्या डावात जेमतेम २८० धावसंख्या उभारता आली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्यामुळे त्यांना ६ बाद २१३ करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर अल्विरो पीटरसनने (२१) निराशा केल्यानंतर कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि हशिम अमला यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. परंतु इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने अखेरच्या सत्रात सामन्यावर नियंत्रण मिळवताना दक्षिण आफ्रिकेची १ बाद १३०वरून ६ बाद १४६ अशी दयनीय अवस्था केली. स्मिथने ११ चौकारांच्या साहाय्याने ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. झहीरने त्याला पायचीत करून तंबूची वाट दाखवली. इशांत शर्माच्या गोलंदाजीचे २०-४-६४-३ असे भेदक पृथक्करण आहे, तर शमीने ४८ धावांत २ बळी घेत त्याला छान साथ दिली. खेळ थांबला तेव्हा व्हर्नन फिलँडर ४८ आणि फॅफ डय़ू प्लेसिस १७ धावांवर खेळत असून, दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप ६७ धावांनी पिछाडीवर आहे. फिलँडर आणि प्लेसिस यांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला.
त्याआधी़, सकाळच्या सत्रात व्हर्नन फिलँडरने तीन झटपट बळी मिळवल्यामुळे भारताचा पहिला डाव तासाभराच्या खेळात फक्त २८० धावांत आटोपला. ५ बाद २५५ धावसंख्येवरून भारताने आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला, परंतु गुरुवारी उर्वरित निम्मा संघ फक्त २५ धावांत गारद झाला. फिलँडरने २७ षटकांत ६१ धावांत ४ बळी घेतले, तर मॉर्नी मॉर्केलने ३४ धावांत ३ बळी घेतले. डेल स्टेन याने गुरुवारी सकाळी फक्त तीन षटके गोलंदाजी केली. परंतु त्याला आपल्या बळींची संख्या वाढवता आली नाही.
महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी सकाळी स्टेन आणि फिलँडरच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देत सुरुवात केली. परंतु धोनीला (१९) बाद करून मॉर्केलने गुरुवारी भारतीय संघाला पहिला धक्का दिला. मग अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या रहाणेचा (४७) अडसर फिलँडरने दूर केला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. डी व्हिलियर्स गो. मॉर्केल ६, शिखर धवन झे. ताहीर गो. स्टेन १३, चेतेश्वर पुजारा धावचीत २५, विराट कोहली झे. डय़ुमिनी गो. कॅलिस ११९, रोहित शर्मा झे. डी व्हिलियर्स गो. फिलँडर १४, अजिंक्य रहाणे झे. डी व्हिलियर्स गो. फिलँडर ४७, महेंद्रसिंग धोनी झे. डी व्हिलियर्स गो. मॉर्केल १९, रविचंद्रन अश्विन नाबाद ११, झहीर खान पायचीत गो. फिलँडर ०, इशांत शर्मा त्रिफळा गो. फिलँडर ०, मोहम्मद शमी त्रिफळा गो. मॉर्केल ०, अवांतर : (बाइज ४, लेगबाइज ६, वाइड १४, नोबॉल २) २६, एकूण १०२.६ षटकांत सर्व बाद २८०
बाद क्रम : १-१७, २-२४, ३-११३, ४-१५१, ५-२१९, ६-२६४, ७-२६४, ८-२६४, ९-२७८, १०-२८०
गोलंदाजी : डेल स्टेन २६-७-६१-१, व्हर्नन फिलँडर २७-६-६१-४, मॉर्नी मॉर्केल २३-१२-३४-३, जॅक कॅलिस १४-४-३७-१, इम्रान ताहिर ८-०-४७-०, जे पी डय़ुमिनी ५-०-३०-०
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ग्रॅमी स्मिथ पायचीत गो. खान ६८, अल्विरो पीटरसन पायचीत गो. शर्मा २१, हशिम अमला त्रिफळा गो. शर्मा ३६, जॅक कॅलिस पायचीत गो. पायचीत गो. शर्मा ०, ए बी डी व्हिलियर्स पायचीत गो. शमी १३, जे पी डय़ुमिनी झे. विजय गो. शमी २, फॅफ डय़ू प्लेसिस खेळत आहे १७, व्हर्नन फिलँडर खेळत ४८, अवांतर (लेगबाइज ४, वाइड १, नोबॉल ३) ८, एकूण ६६ षटकांत ६ बाद २१३
बाद क्रम : १-३७, २-१३०, ३-१३०, ४-१३०, ५-१४५, ६-१४६
गोलंदाजी : झहीर खान २२-४-७२-१, मोहम्मद शमी १८-३-४८-२, इशांत शर्मा २०-४-६४-३, आर. अश्विन ६-०-२५-०.

Story img Loader