Ishant Sharma thinks Yashasvi Jaiswal has a chance for a century: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद ८० धावा केल्या आहे. या सामन्यात रोहितसोबत यशस्वी जैस्वाल सलामीला आला आहे. त्याच्याबद्दल वेगवान गोलंदाज इशांत शर्माने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, ज्याने जिओसिनेमावर एक्सपर्ट म्हणून आपल्या डावाची सुरुवात केली, त्याने दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल सांगितले, “रोहित शर्मा (नाबाद ३०) आणि यशस्वी जैस्वाल (नाबाद ४०) सुरुवातीच्या तासात त्यांच्या दृष्टिकोनात सावध दिसतील. आपण धावा काढू शकलो नसलो तरी हरकत नाही, असे ते स्वतःला सांगतील. आपल्याकडे आधीच मजबूत आधार असल्याने त्यांना विकेटवर टिकून राहावे लागेल. ते आपला वेळ घेतील आणि उर्वरित ७० धावा करण्याचा प्रयत्न करतील. कारण या सामन्यात अजून बराच वेळ आहे.
यशस्वी जैस्वाल, जो आपला कसोटी पदार्पण सामना खेळत आहे, त्याच्याबद्दल, इशांत म्हणाला, “आता त्याच्याकडे एक व्यासपीठ आहे, ज्यावर त्याचा डाव तयार केला जाईल. त्याने आधी आपले अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर हळूहळू आपला डाव उभारला पाहिजे. त्याच्यासाठी शतक झळकावण्याची मोठी संधी आहे.” बुधवारी पाहिल्याप्रमाणे, विकेट फिरकीपटूंना साथ देणारी दिसत होती. याबाबत इशांत म्हणाला, “जसा दिवस पुढे जाईल, विकेटही खराब होत जाईल. त्यामुळे भारत सध्या ज्या स्थितीत आहे, त्यांनी ३०० धावांची आघाडी पाहिली पाहिजे जेणेकरून त्यांना दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागणार नाही.”
वेस्ट इंडिजवर लक्ष केंद्रित राहिल्यास ते अजूनही पुनरागमन करू शकतात, असा विश्वास इशांतला वाटतो. इशांत म्हणाला, “वेस्ट इंडिजसाठी पहिले सत्र महत्त्वाचे असेल. पहिल्या तासात विकेट्स मिळाल्या नसल्या तरी रनरेटवर अंकुश ठेवून सामन्यात टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताची सध्या एकही विकेट न गमावता धावसंख्या ८० धावा आहे. परंतु यजमानांना हे समजेल की जर त्यांनी पहिल्या तासात फक्त २० धावा दिल्या, तर ते नंतर विकेट घेण्याच्या चांगल्या स्थितीत असतील. तिथून, त्यांचे फिरकीपटू चांगली कामगिरी करू शकतात. कारण खेळपट्टी त्यांना साथ देऊ शकते.”