* इशांत शर्माचे ५१ धावांत ६ बळी ’न्यूझीलंडचे १९२ धावांत लोटांगण
* धवनच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत २ बाद १००
वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर इशांत शर्माची ‘इश्कीयाँ’ भारतासाठी फलदायी ठरली. बेसिन रिव्हर्सच्या अनुकूल वातावरणात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवून आपला प्रेम दिन साजरा केला. इशांतने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी करताना ५१ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत सरस दिसून आला.
हिरव्यागार खेळपट्टीची साद ऐकून सकाळी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि इशांतने तो सार्थ ठरवला. इशांतच्या वेगवान माऱ्यापुढे किवी फलंदाजांनी फक्त १९२ धावांत लोटांगण घातले. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (७० धावांत ४ बळी) त्याला छान साथ दिली. केन विल्यम्सन (४७) आणि पदार्पणवीर जेम्स नीशाम (३३) या फलंदाजांना शमीने महत्त्वाच्या क्षणी बाद करून न्यूझीलंडला मोठय़ा भागीदारीपासून रोखले.
त्यानंतर सलामीवीर शिखर धवनने नाबाद अर्धशतक झळकावत किवी भूमीवरील स्थैर्याचा इशारा दिला. त्यामुळेच दिवसअखेर २ बाद १०० अशी भारताची समाधानकारक स्थिती होती. आता भारताचा संघ अद्याप ९२ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने मुरली विजय (२) आणि चेतेश्वर पुजारा (१९) या फलंदाजांना गमावले. परंतु खेळ थांबला तेव्हा धवन (७१) आणि नाइट वॉचमन इशांत शर्मा (३) मैदानावर होते.
इशांतने ईडन पार्कवर झालेल्या पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीतही टिच्चून मारा केला आणि मालिकेत दुसऱ्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली. त्याने आपल्या ५५व्या कसोटीत पाचव्यांदा हा पराक्रम दाखवला.
इशांतचे पहिला स्पेल हा किवी फलंदाजांवर दहशत निर्माण करणारा होता. त्याने आपल्या पहिल्या चार षटकांमध्ये चार फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. त्यामुळे दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची अपेक्षा करणाऱ्या भारतासाठी पहिला दिवस तारणारा ठरला.
अनुभवी झहीर खानला शुक्रवारी यश मिळाले नाही. परंतु शमीने खेळपट्टीचा अचूक वापर करीत आपल्या खात्यावर चार बळी जमा केले. शमीच्या पहिल्या तीन षटकांमध्ये सलामीवीरांनी १४ धावा काढल्या.
२००७-०८मध्ये रिकी पॉन्टिंगला बाद करणारा, २०११मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा आणि या सामन्याच्या पहिल्या डावात सहा बळी घेणारा मी तोच आहे. त्यामध्ये कोणताही फरक नाही. या वेळी गेल्या सामन्यासारखीच खेळपट्टी होती, पण मी माझ्या गोलंदाजीचे जास्त पृथक्करण केले नाही. हा सर्व बदल मानसिक आहे. तुम्ही अनुभवातून शिकत असता. आयुष्यात बरेच चढ-उतार आले. जेव्हा महत्त्वाचा दौरा असेल तेव्हा मला वगळण्यात येत होते, हे पचवणे माझ्यासाठी सोपे नाही.
इशांत शर्मा, भारताचा वेगवान गोलंदाज
पहिल्या दिवसाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना द्यायला हवे, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. ऑकलंडमधील सामन्यानंतर त्यांच्या गोलंदाजीला चांगली लय सापडली होती. या हिरव्या खेळपट्टीवर आम्ही वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या वेळी खेळलो होतो, पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली नव्हती. भारतीय गोलंदाजांनी मात्र अचूक मारा केला. संघातील फलंदाजांसाठी हे एक आव्हान आहे. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भेदक मारा करत आम्ही भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करू.
केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा फलंदाज
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. इशांत १३, हमिश रुदरफोर्ड झे. विजय गो. इशांत १२, केन विल्यम्सन झे. रोहित गो. शमी ४७, टॉम लॅथम झे. धोनी गो. इशांत ०, ब्रेन्डन मॅक्क्युलम झे. जडेजा गो. शमी ८, कोरे अँडरसन झे. कोहली गो. इशांत २४, बी जे वॉटलिंग झे. रोहित गो. इशांत ०, जिम्मी नीशाम झे. धोनी गो. शमी ३३, टिम साऊदी झे. विजय गो. इशांत ३२, नील वॉगनर नाबाद ५, ट्रेंट बोल्ट झे. पुजारा गो. शमी २, अवांतर (नोबॉल ६, वाइड ८, लेगबाइज २) १६, एकूण ५२.५ षटकांत सर्व बाद १९२
बाद क्रम : १-२३, २-२६, ३-२६, ४-४५, ५-८४, ६-८६, ७-१३३, ८-१६५, ९-१८४, १०-१९२
गोलंदाजी : झहीर खान १७-३-५७-०, मोहम्मद शमी १६.५-४-७०-४, इशांत शर्मा १७-३-५१-६, रवींद्र जडेजा २-१-१२-०
भारत (पहिला डाव) : शिखर धवन खेळत आहे ७१, मुरली विजय झे. वॉटलिंग गो. साऊदी २, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. बोल्ट १९, इशांत शर्मा खेळत आहे ३, अवांतर (वाइड १, बाइज ४) ५, एकूण २८ षटकांत २ बाद १००.
बाद क्रम : १-२, २-८९
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ९-४-१८-१, टिम साऊदी ७-०-२०-१, नील वॉगनर ७-०-३६-०, कोरे अँडरसन ३-०-१४-०, जिम्मी नीशाम २-०-८-०.