आर्थिक राजधानी मुंबईत फुटबॉलसाठी मैदान उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला मुंबईबाहेरील स्टेडियमवर सामने खेळावे लागत आहेत. सरावासाठीही आमच्यासमोर नवी मुंबईचाच पर्याय आहे, अशी खंत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेतील मुंबई सिटी एफसी क्लबचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने गेल्या वर्षांअखेरीस एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती. मात्र त्याची ही खंत लवकरच दूर होणार असल्याची चिन्हे आहेत. अंधेरी क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या फुटबॉल मैदानावर मुंबई सिटीला घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

आठ संघांचा समावेश असलेल्या आयएसएल स्पध्रेची २०१३मध्ये घोषणा झाली व १२ ऑक्टोबर २०१४मध्ये स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. यंदा ही स्पर्धा तिसऱ्या वर्षांत पदार्पण करत असून मुंबई सिटी एफसीला हक्काच्या घरच्या मैदानावर खेळता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने अंधेरी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान बनवण्यात आले. नैसर्गिक गवताच्या या मैदानावर गेल्या आठवडय़ात क्रिकेट व बॉलिवूडमधील दिग्गजांमध्ये मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवण्यात आला. जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) निकषानुसार या मैदानाची उभारणी करण्यात आली असल्याचे एमडीएफएचे सचिव उदयन बॅनर्जी यांनी सांगितले. त्यामुळे १५ ते २० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर आगामी काळात आयएसएलचे सामने होण्यास हरकत नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले. मात्र त्यावर अधिकृत टिपणी करण्यास त्यांनी नकार दिला.

२०१७ साली भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या आठ स्टेडियममध्ये नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमचाही समावेश आहे आणि तत्पूर्वी मैदानाची डागडुजी व फिफाचे इतर निकष पूर्ण करण्यासाठी या मैदानावर वर्षभर कोणत्याही स्पध्रेचे आयोजन करणे शक्य नसल्याचे सुत्रांनी सांगितले. हे ग्रा धरल्यास आयएसएलचे सामने पाहण्यासाठी नवी मुंबईत जाण्याचा मुंबईकर फुटबॉलरसिकांचा त्रास वाचू शकेल. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांत खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे २०१६मध्ये जरी आयएसएलचे सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाले, तरी पुढील वर्षी त्यांच्यासाठी अंधेरीचा पर्याय आहे.

मुंबई सिटीकडून तसा प्रस्ताव नाही

‘‘मुंबई सिटी एफसी संघाचे सामने अंधेरी क्रीडा संकुलात खेळविण्यात यावे असा कोणताही प्रस्ताव आला नाही,’’ असे एमडीएफएचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरीतले स्टेडियम बनवण्यात आले आहे. मुंबईतील विद्यालयीन आणि महाविद्यालयीन खेळाडूंना उत्तम दर्जाच्या मैदानावर खेळता यावे याकरिता या स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे.

Story img Loader