क्लब की देश प्राधान्य वाद पुन्हा ऐरणीवर

खेळाडूंनी देशाला प्राधान्य द्यायचे का क्लब हा मूलभूत वाद ब्राझीलचा फुटबॉलपटू नेयमारच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घरच्या मैदानांवर होणाऱ्या ऑलिम्पिक तसेच कोपा अमेरिका स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघाला नेयमार हवा आहे. दुसरीकडे याच काळात होणाऱ्या महत्त्वपूर्ण लढतींसाठी बार्सिलोना क्लबलाही नेयमार संघात हवा आहे. दोन्हीपैकी एकाच संघाकडून खेळता येणार असल्याने नेयमारपुढे पेचप्रसंग आहे.

शुक्रवारी बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष जोसेप मारिया बाटरेमेयू यांनी ब्राझील फुटबॉल महासंघाला पत्र पाठवले असून, नेयमारला ऑलिम्पिक किंवा कोपा अमेरिका या दोनपैकी एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बार्सिलोनाकडून परवानगी देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान बार्सिलोनाच्या आक्रमणाचा अविभाज्य घटक असलेल्या नेयमारला ऑलिम्पिक तसेच कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझीलचे प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा आहे. मात्र क्रीडा जगतातील सर्वोच्च स्पर्धा असलेली ऑलिम्पिक स्पर्धा फिफा संचालित स्पर्धा नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी नेयमारला मुक्त करणे बार्सिलोनासाठी बंधनकारक नाही. दुसरीकडे क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च व्यासपाठीवर देशाचे प्रतिनिधित्त्व करणे अभिमानास्पद आहे. त्यामुळे नेयमारचे ब्राझीलकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. नेयमारवरून बार्सिलोना आणि ब्राझील फुटबॉल महासंघात रस्सीखेच निर्माण झाली आहे.

‘नेयमार आमच्या डावपेचांचा महत्त्वपूर्ण घटक आहे. ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलने एकदाही सुवर्णपदकाची कमाई केलेली नाही. त्यादृष्टीने नेयमार संघात असणे महत्त्वाचे आहे. कोपा अमेरिका स्पर्धेतील ब्राझीलच्या प्रदर्शनावर प्रशिक्षक डुंगा यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि कोपा अमेरिका स्पर्धासाठी नेयमार संघात असणे गरजेचे आहे’,  असे ब्राझील फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले.

Story img Loader