It depends on my father’s health Deepak Chahar said about joining Team India : भारतीय संघ १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरचा टी-२० आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियात समावेश आहे. आता दीपक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक, वडिलांच्या आजारपणामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी अनुपलब्ध असू शकतो.
बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी दीपक त्याच्या घरी परतला होता, त्याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक केल्यानंतर माहिती दिली होती. तो म्हणाला होती, दीपक वैद्यकीय कारणामुळे घरी परतला आहे. आता दीपकने स्वतः सांगितले की त्याच्या वडिलांना गंभीर ब्रेन स्ट्रोक आला असून ते रुग्णालयात दाखल आहेत.
‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना दीपक चहर म्हणाला, “माझे वडील माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी मला तो खेळाडू बनवले, जो आज मी आहे. त्यांना या स्थितीत सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही.” दक्षिण आफ्रिकेबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडकर्त्यांशी चर्चा केल्याचेही भारतीय वेगवान गोलंदाजाने स्पष्ट केले.
दीपक पुढे म्हणाला, “आम्ही त्यांना वेळीच रुग्णालयात आणले, अन्यथा ते धोकादायक ठरू शकले असते. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.” आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियात सामील होण्याबाबत तो म्हणाला, “हे माझ्या वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. सध्या मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही.”
हेही वाचा – “विराट कोहलीला मी हटवलं नाही, एवढंच म्हणालो की..” कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर सौरव गांगुलीने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आफ्रिका दौऱ्यावर मिळाली संधी –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मुकेश कुमारच्या अनुपस्थितीत दीपकला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. चौथ्या सामन्यातही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. आता त्याचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.