Tim Paine Praises Indian Team : भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने विजया आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. आता भारताच्या मालिका विजयावर प्रतिक्रिया देताना ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने भारताचे कौतुक करताना इंग्लंडला चिमटा काढला आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार टिम पेनने भारताच्या युवा खेळाडूंचे कौतुक केले आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या पराभवावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या ब संघाकडून इंग्लंडचा पराभव पाहिल्यानंतर मला खूप बरे वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. टिम पेनच्या म्हणण्यानुसार, त्यालाही त्याच्या कर्णधारपदाखाली घरच्या मैदानावर भारताच्या ब संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याचे दुःख त्याला माहीत आहे.
खरे तर सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अनेक मोठे खेळाडू भारतीय संघाचा भाग नव्हते. या मालिकेत केएल राहुल, मोहम्मद शमी आणि विराट कोहलीसारखे खेळाडू खेळले नाहीत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश नाही. केएल राहुलने पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. या सर्व कारणामुळे सर्फराझ खान, आकाश दीप, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार या खेळाडूंनी पदार्पण केले. असे असतानाही भारतीय संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडचा पराभव केला.
हेही वाचा – IND vs ENG : पडिक्कल चौथ्या क्रमांकावर पदार्पण करणारा ठरला नववा भारतीय, अर्धशतक झळकावत केला नवा विक्रम
इंग्लंडच्या पराभवाबद्दल टिम पेनला विचारले असता, त्याने सांगितले की, इंग्लंडचा पराभव पाहून मला बरे वाटत आहे. तो म्हणाला, “मला माहित आहे की भारताच्या ब संघाकडून हरल्यावर कसे वाटते. दुर्दैवाने हे आमच्या घरच्या मैदानावर घडले होते. भारताचे अनेक मोठे खेळाडू या मालिकेत खेळत नव्हते आणि याचा फायदा इंग्लंड संघाने घ्यायला हवा होता. इंग्लंडचा खेळ पाहण्यात मला खूप आनंद झाला.”
इंग्लंडचा पराभव पाहून आनंद झाला – टिम पेन
माजी कर्णधार टिम पेन पुढे म्हणाला, “इंग्लंड संघ आतापर्यंत ज्या प्रकारे खेळला आहे, ते मला आवडते. त्यांना हरताना पाहून मला बरं वाटलं. मला चुकीचा समजा पण त्यांनी मनोरंजक आणि रोमांचक क्रिकेट खेळले. या विजयामुळे भारतीय क्रिकेट संघाकडे किती महान खेळाडू आहेत हे दिसून येते. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे.”