पुणे : कबड्डीच नाही तर खो-खोसारखे देशी खेळ शहरी भागातून कमी होत चालल्याची खंत व्यक्त करून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी शहरी भागातील देशी खेळांचे आस्तित्व टिकायला हवे आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याची भावना व्यक्त केली. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखविणाऱ्या कबड्डीपटूंचा अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी गौरव करण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत होते.
‘‘पुणे जिल्हा संघटनेच्या समोरील मैदानावर हा गौरव सोहळा पार पडला. एक काळ असा होता की मुंबई, पुण्यातील संघ कबड्डीवर हुकमत गाजवत होते. मात्र, आता सातारा, सांगली, परभणी अशा ग्रामीण भागातील संघ वर्चस्व राखू लागले आहेत. शहरातून देशी खेळ कमी होत चालल्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे शहरी भागातील देशी खेळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी शासन आणि क्रीडा संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे,’’ पवार यांनी सांगितले.
राज्यातील खेळाडूंवर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देणे, खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेणे, विविध भागांत सरावासाठी आमदार निधीतून मदत करणे अशा कामांना यापुढे प्राधान्य राहील, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. या वेळी राष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा, तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष, महिला आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या पुणे जिल्हा महिला संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या वेळी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य व पुणे जिल्हा संघटनेचे अन्य पदाधिकारी, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शंकुतला खटावकर यांच्यासह सूर्यकांत पाटील, माणिक भोगाडे, शोभा भगत, प्रविण नेवाळे असे अनेक आजी माजी कबड्डीपटू उपस्थित होते.
राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात
यंदाच्या राज्य कबड्डी स्पर्धेच्या हंगामात राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात येणार असून, कुमार गटाची स्पर्धा जळगाव येथे होणार आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.