सहा वेळा जग्गजेते पदावर नाव कोरणारी आणि २०१२ मध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमने बॉक्सिंगला राम राम केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.. बुधवारी तिने आपण बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र या सगळ्या चर्चांदरम्यान मेरी कोमची पोस्ट समोर आली आहे. माझ्या निवृत्तीच्या बातम्या येत आहेत मात्र मी कुठलीही घोषणा केलेली नाही असं तिने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाच्या नियमानुसार चाळिशी ओलांडलेल्या बॉक्सर्सना बॉक्सिंगच्या स्पर्धेत भाग घेण्याची संमती नाही. मात्र आता मेरी कोमचं म्हणणं वेगळं आहे. (Latest News)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे मेरी कोमने?

“मी बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. माझं जे म्हणणं होतं ते चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. जेव्हा मला निवृत्ती जाहीर करायची असेल तेव्हा मी स्वतः माध्यमांसमोर येऊन म्हणणं मांडेन. काही मीडिया रिपोर्टनुसार मी निवृत्तीची घोषणा केली आहे असं सांगितलं जातं आहे मात्र ते योग्य नाही. मी २४ जानेवारी रोजी डिब्रूगढ येथील एका शाळेत गेले होते. तिथे मी हे म्हटलं होतं की मला अजूनही खेळण्याची इच्छा आहे. मात्र माझं आत्ताचं वय पाहता ऑलिम्पिकमध्ये मला सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मी माझा खेळ करत राहते आहे. इतकंच नाही तर मी माझ्या फिटनेसवरही भर देते आहे. असं म्हटलं होतं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला जेव्हा निवृत्ती जाहीर करायची असेल तेव्हा मी निवृत्ती सगळ्यांच्या समोर येऊन जाहीर करेन.”

मेरी कोमच्या नावे अनेक रेकॉर्ड

मेरी कोमने जागतिक अॅमेच्योर बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सहावेळा जगज्जेतेपद मिळवलं आहे. हा रेकॉर्ड करणारी ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. तसंच मेरी कोम वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सात वेळा पदक जिंकण्याच्या रेकॉर्डही तिच्या नावे आहे. २०१८ मध्ये मणिपूर सरकारने तिच्या बॉक्सिंगमधल्या कारकिर्दीसाठी तिला मीथोई लीमा ही उपाधी देऊन गौरवलं होतं. तसंच मेरी कोमला पद्मश्री, पद्म भूषण, अर्जुन पुरस्कार आणि इतर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित मेरी कोम नावाचा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने यात मेरी कोमचं पात्र साकारलं आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक गेम्समधल्या ५१ किलो वजनी गटात तिने कांस्य पदक जिंकलं होतं. २०१४ मध्ये दक्षिण कोरियातील इंचियोन या ठिकणी एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली. २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकलं होतं. ANI या वृत्तसंस्थेने मेरी कोमने निवृत्ती घेतल्याची घोषणा केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र आता मेरी कोमने हे वृत्त फेटाळलं आहे.

कमबॅकनंतरही उत्तम कामगिरी

२०१२ मध्ये जेव्हा मेरीने ऑलिम्पिक पदक जिंकलं त्यानंतर तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने काही काळ विश्रांती घेतली. २०१८ मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने जोरदार कमबॅक केलं आणि युक्रेनच्या हन्ना ओखोटाला ५-० ने हरवलं. तसंच यानंतर एक वर्षाने तिने तिचं आठवं वर्ल्ड मेडल जिंकलं. आत्तापर्यंत भारतीय बॉक्सिंगपटूने कधीही न केलेली कामगिरी मेरी कोमने करुन दाखवली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is over star india boxer mary kom draws curtain on remarkable career scj
Show comments