ICC Cricket World Cup 2023, England vs New Zealand: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पहिल्या साखळी सामन्यात इंग्लंडच्या संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करून इंग्लंड क्रिकेट संघाने असे काही केले, जे याआधी कोणत्याही संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केले नव्हते. इंग्लंड संघाने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि या सामन्यात जो रूटच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या. त्याचबरोबर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने एक आश्चर्यकारक विक्रम नोंदवला.
विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं –
या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी इतिहास रचला. खरं तर, एकदिवसीय विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे, जेव्हा एका संघाच्या सर्व फलंदाजांनी म्हणजे ११ फलंदाजांनी १० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली खेळली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या क्रमांकापासून ते ११व्या क्रमांकापर्यंतच्या इंग्लंडच्या फलंदाजांनी १० हून अधिक धावांची खेळी खेळली. या सामन्यात इंग्लंडने शेवटच्या १० षटकात केवळ २ चौकार मारले असले तरी, तरीही संघाने २८२ धावांपर्यंत मजल मारली.
एका संघाच्या सर्व ११ फलंदाजांनी ओलांडला दुहेरी धावांचा आकडा –
इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचे, तर या सामन्यात जॉनी बेअरस्टो ३३ धावा करून बाद झाला. त्याचबरोबर डेव्हिड मलान १४ धावा करून बाद झाला. यानंतर हॅरी ब्रूकने २५ तर मोईन अलीने ११ धावा केल्या. संघाचा कर्णधार जोस बटलरने ४२ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. तसेच लियाम लिव्हिंगस्टोनने २० आणि ख्रिस वोक्स ११ धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले. सॅम करननेही १४, आदिल रशीद १५ आणि धमार्क वुडने १३ धावांचे योगदान दिले. जो रूटने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ७७ धावा केल्या.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला खूप त्रास दिला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यापूर्वी २०१९ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले होते. अशाप्रकारे जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गतविजेता म्हणून विश्वचषकात प्रवेश केला.