न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर, भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघातील महत्वाचा खेळाडू महेंद्रसिंह धोनीचा जोरदार बचाव केला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. या सामन्यात धोनीने खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी केलेला संथ खेळ हा चर्चेचा विषय बनला होता. त्याच्या या खेळीवर अनेकांनी टीका करत, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, विरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंनी धोनीला टी-२० क्रिकेटमधे तरुणांना संधी देत, फक्त वन-डे क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अशा परिस्थितीतही कर्णधार विराट कोहली धोनीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आहे.
अवश्य वाचा – धोनीने संघातली आपली जागा ओळखावी, विरेंद्र सेहवागचा सल्ला
” दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सर्वजण धोनीला का दोषी ठरवत आहेत, याचं मला कारणच समजतं नाहीये. जर मी एखाद्या मालिकेत सलग तीनवेळा अपयशी ठरलो, तरीही मला कोणी बोलणार नाही. पण धोनी ३५ वर्षाचा झालाय आणि तो आता पहिल्यासारखा खेळू शकत नाहीये, असा अंदाज बांधत धोनीला टीकेचा धनी बनवणं योग्य नसल्याचं,” विराटने स्पष्ट केलंय. थिरुअनंतपुरमचा सामना जिंकल्यानंतर कोहली पत्रकार परिषदेत बोलत होता.
अवश्य वाचा – एका अपयशी खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होणं दुर्दैवी – सुनील गावसकर
धोनी अजुनही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. तो सर्व फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण होतोय. फलंदाजी असो किंवा, क्षेत्ररक्षण सर्व प्रकारात तो संघाच्या विजयात हातभार लावतोय. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीला जेव्हा जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला धोनी हा संघातला महत्वाचा खेळाडू असल्याचं विराट कोहलीने सांगितलं आहे.
अवश्य वाचा – धोनीनं टी-२० क्रिकेट खेळण्याबाबत फेरविचार करावा- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
दुसऱ्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंनी महेंद्रसिंह धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याची मागणी केली. राजकोटच्या टी-२० सामन्यात धोनी सहाव्या क्रमांकावर खेळायला आला होता. यासंदर्भात विराट कोहलीला प्रश्न विचारला असता विराटने आपली बाजू स्पष्ट केली. ” आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं की ज्या क्रमांकावर दुसऱ्या सामन्यासाठी धोनी फलंदाजीला आला होता, तिकडे भराभर धावा करणं कठीण होतं. हार्दिक पांड्यासारखा खेळाडूही अशा परिस्थितीत काहीकाळ स्वतःला स्थिर होण्यासाठी वेळ देतो. ज्या क्षणी धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा आम्हाला विजयासाठी प्रत्येक षटकांत अंदाजे १०-१५ धावांची गरज होती. मग अशावेळी फक्त धोनीला पराभवासाठी जबाबदार धरण योग्य ठरणार नाही,” असंही विराट कोहली म्हणाला. त्यामुळे खुद्द कर्णधाराकडून पाठींबा मिळाल्याने धोनीच्या निवृत्तीबाबतची चर्चा पुढचा काही काळ थांबेल अशी आशा करायला हरकत नाही.
अवश्य वाचा – धोनीला टी-२० सोडण्याचा सल्ला देणाऱ्यांना भूवीचा शाब्दिक यॉर्कर