ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४-० असे निर्भेळ यश संपादन करणाऱ्या भारतीय संघाची सलामीवीर गौतम गंभीरने स्तुती केली आहे. मात्र जागतिक क्रिकेटमधील महासत्ता म्हणून आपले स्थान कायम राखण्यासाठी भारताने परदेशातील कसोटी मालिकांमध्येही चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले आहे.
‘‘परदेशातील खेळपट्टय़ांवर जोपर्यंत विजय मिळवता येत नाहीत, तोपर्यंत त्या संघाची महासत्ता म्हणून ओळख निर्माण होत नाही. माझ्या मते, परदेशातील वातावरणात कसोटी सामने जिंकणे, हे फारच आव्हानात्मक आणि अवघड असते. घरच्या मैदानांवर भारताची कामगिरी चांगली झाली, याचा आनंद होत आहे. मायदेशातील खेळपट्टय़ांच्या फायदा उठविणे, चुकीचे नाही. कारण प्रत्येक संघ तसे करत असतो. पण दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची करामत केली. म्हणूनच दक्षिण आफ्रिका संघच खऱ्या अर्थाने कसोटीतील महासत्ता आहे,’’ असे गंभीरने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘परदेशातील कसोटी मालिकांमध्ये विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचा भाग बनणे आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणे, हेच माझे उद्दिष्ट असायचे.’’ काविळीच्या आजारातून बरा झाल्यावर गंभीरने सरावाला सुरुवात केली
आहे.
स्वत:च्या फॉर्मविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझ्या मते, फॉर्म हा मनाचा खेळ आहे. तुम्ही आत्मविश्वासात आणि भयमुक्त असता याचप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असता, त्यावेळी तुमच्याकडून चांगली कामगिरी होते.’’
गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या वर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.
या मोसमाच्या आयपीएलविषयी तो म्हणाला, ‘‘कोणतेही दडपण न घेता क्रिकेट खेळण्याचा सल्ला मी सहकाऱ्यांना दिला आहे. कोलकाता संघ आपल्या गुणवत्तेनुसार खेळ करत नाही, अशी टीका व्हायची. पण कठोर मेहनत घेऊन आम्ही गेल्या वर्षी जेतेपदावर नाव कोरले. युसुफ पठाण, मनोज तिवारी आणि मनविंदर बिस्ला यांना मनमोकळेपणाने खेळण्याचा सल्ला मी दिला आहे.’’
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सरावाला झहीरची दांडी
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) सरावाला वेगवान गोलंदाज झहीर खान याने गुरुवारी दांडी मारली. दुखापतीतून सावरलेला झहीर गुरुवारी सकाळी बंगळुरूत दाखल झाला. पण प्रशिक्षक रे जेनिंग्स यांच्या मार्गदर्शनाखालील सरावाला तो हजर राहिला नाही. मात्र एनसीएचे प्रमुख तंदुरुस्ती तज्ज्ञ आशिष कौशिक यांच्याशी त्याने सल्लामसलत केली.