Border Gavaskar Trophy Josh Hazlewood statement : नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत टीम इंडियाचा ०-३ अशा फरकाने पराभव झाला. या मालिकेत भारतीय फलंदाज सपशेल लोटांगण घालताना दिसले. यानंतर आता २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
क्लीन स्वीपने झोपलेला सिंह जागा झाला –
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अतिशय खराब कामगिरी केली. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका जिंकण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. जोश हेझलवूडने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, क्लीन स्वीपनंतर ते (भारतीय खेळाडू) पुनरागमन करू शकतात. तो म्हणाला, “या क्लीन स्वीपने कदाचित झोपी गेलेला संघ जागा होईल. आता जेव्हा ही टीम आमच्या समोर येईल, तेव्हा आम्ही तयार असू. आमच्यासाठी साहजिकच त्यांचे ३-० ने हरणे ३-० ने जिंकण्यापेक्षा चांगले आहे.”
भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला धक्का –
जोश हेझवूड पुढे म्हणाला, “या पराभवामुळे नक्कीच भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला थोडा धक्का बसला असेल. त्यांच्या संघाचे अनेक फलंदाज येथे खेळले आहेत, पण काही फलंदाज असे आहेत जे खेळले नाहीत. अशा परिस्थितीत, ते बऱ्याच गोष्टींबद्दल थोडे अनिश्चित असतील. मला वाटत नाही की याबद्दल आपण जास्त अंदाज बांधू शकतो. साहजिकच हा निकाल आमच्यासाठी चांगला आहे. याचे श्रेय किवी खेळाडूंना जाते. किवी संघाने खरंच उत्कृष्ट क्रिकेट खेळले.”
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अॅशेसच्या तोडीची –
टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने भारतामध्ये ३-० असा विजय मिळवणे अविश्वसनीय आहे. मालिकेतील प्रत्येक सामना सोडा, तिथे एकही सामना जिंकणे पुरेसे कठीण आहे. आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टीव्हीला सर्वोत्तम रेटिंग देऊ शकते यावरही त्यांनी भर दिला. तो म्हणाला की, ही खूप मोठी मालिका आहे. प्रत्येक वेळी आम्ही भारताशी खेळतो तेव्हा ते ॲशेसच्या बरोबरीची वाटते. मला वाटतं या मालिकेसाठी प्रचंड गर्दी असेल आणि टीव्ही रेटिंग पण खूप जास्त असू शकतात. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे रेटिंग ठरु शकते.