गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे फलंदाजांवर दडपण आले. एकूणच आमची कामगिरी खराब झाली. मात्र याची सुरुवात गोलंदाजांपासून झाली. ३०० पेक्षा अधिक धावा होऊ शकतील अशी ही खेळपट्टी नव्हती असे उद्गार भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने काढले. तो म्हणाला, ‘आमची सुरुवात खराब झाली, आम्ही अधिक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करायला हवी होती. येथील परिस्थितीचा अंदाज येणे महत्त्वाचे असते. कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची याची दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना माहिती होती. तशाच पद्धतीने भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजी करणे आवश्यक होते. ३०० पेक्षा धावा दिल्यावर साहजिकच फलंदाजांवर दडपण येते.
त्यामुळे नवीन चेंडूसह कशी गोलंदाजी होते आहे हे महत्त्वाचे आहे. सामान्यत: शेवटच्या दहा षटकांत भरपूर धावा होतात, त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवल्यास प्रतिस्पध्र्यावर दडपण आणता येते. कागदावरती अशीच योजना आखण्यात आली होती मात्र ती मैदानावर साकारू शकली नाही. सर्व प्रमुख गोलंदाजांनी पन्नासपेक्षा अधिक धावा दिल्या. शमीने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली.
प्रत्येक संघांचा अभ्यास केला तर सगळ्या संघांचे गोलंदाजांच्या चेंडूवर धावा निघतात. त्यामुळे ही केवळ भारतीय संघासाठी मर्यादित गोष्ट नाही. ३० गज वर्तुळात अतिरिक्त क्षेत्ररक्षक आणि रिव्हर्स स्विंगचा अभाव असल्याने अव्वल दर्जाच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवरही धावा कुटल्या जातात.  
सरावासाठी आमच्याकडे कमी वेळ होता. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर आमच्याकडे २ ते ३ दिवस होते. खेळपट्टीशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेता आले असते.
भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत दक्षिण आफ्रिकेने ३५८ धावांचा डोंगर उभारला. क्विंटन डि कॉकने १३५ धावांची खेळी केली. ए बी डीव्हिलियर्सने ७७ तर जे.पी.डय़ुमिनीने ५९ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव २१७ धावांतच आटोपला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक ६५ धावा केल्या.

Story img Loader