एपी, डॉर्टमंड
सामन्याच्या अवघ्या २३व्या सेकंदाला गोल स्वीकारल्यानंतरही गतविजेत्या इटलीने युरो फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. इटलीने अल्बेनियाचा २-१ असा पराभव केला. चार वर्षांपूर्वी विजेतेपद मिळविल्यानंतर इटलीचा संघ एकाही मोठ्या स्पर्धेत खेळलेला नाही. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ते अपात्र ठरले होते. चार वर्षांनंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळताना सुरुवात वाईट होऊनही त्यांनी विजेतेपद मिळविण्याच्या इराद्याने पहिले पाऊल यशस्वी टाकले.
अर्थात, इटलीनेही त्यांना तसेच वेगवान खेळाने प्रत्युत्तर दिले. सामन्याच्या ११व्या मिनिटाला अॅलेसांद्रो बॅस्टोनीने गोल करून इटलीला बरोबरी साधून दिली आणि नंतर पाच मिनिटांनी निकोलो बारेल्लाने गोल करून इटलीची आघाडी वाढवली. ही आघाडी कायम ठेवत इटलीने आपल्या युरोच्या प्रवासास विजयी सुरुवात केली.
हेही वाचा >>>IND W vs SA W: स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज
नेदिम बजरामीच्या २३व्या सेकंदाला गोल नोंदवूनही अल्बेनियाला या वेगवान सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. इटलीवर दडपण ठेवण्यात त्यांना अपयश आले. बजरामीच्या वेगवान गोलनंतर मैदानात उपस्थित अल्बेनियाच्या असंख्य चाहत्यांनी एकच जल्लोषाला सुरुवात केली. मात्र, अल्बेनिया खेळाडूंवर याचा उलटा परिणाम झाला आणि ते या दडपणाचा सामना करू शकले नाही. त्यामुळे जल्लोषात गर्क असलेल्या अल्बेनियन चाहत्यांना बरोबरीचा आणि नंतर पिछाडीवर टाकणारा गोल बघावा लागला. त्यानंतर मात्र अल्बेनियाच्या चाहत्यांमध्ये शांतता पसरली.
स्पालेट्टींनी या वर्षी ऑगस्टमध्येच प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघाने १२ सामन्यांत केवळ एकच पराभव स्वीकारला आहे. दुसऱ्यांदाच युरो स्पर्धेत खेळणाऱ्या अल्बेनियाचे प्रशिक्षक सिल्विन्हो यांनी खेळाडूंच्या झुंजीचे कौतुक केले.
इटलीने अल्बेनियाला झटपट गोलची भेट दिली असली, तरी त्यानंतरही त्यांनी पूर्वार्धात प्रेक्षणीय खेळ केला. त्यांनी क्वचितच अल्बेनियाच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्याची संधी दिली हे त्यांच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचवेळी अल्बेनियाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. त्यांना चेंडूवर ताबा मिळवणेदेखील कठीण झाले होते. इथेच त्यांचा खऱ्या अर्थाने पराभव झाला. त्यामुळे उत्तरार्धात सामन्यात टिकून राहिल्यानंतरही त्यांना बरोबरी साधता आली नाही.
२० वर्षांचा इतिहास बदलला
अल्बेनियाच्या नेदिम बजरामी याने सामन्याला सुरुवात होत नाही, तो अवघ्या २३व्या सेकंदाला गोल करून फुटबॉल विश्वाला स्तंभित केले. युरो स्पर्धेतील यापूर्वीचा सर्वात वेगवान गोल रशियाच्या दिमित्री किरीचेन्कोच्या नावावर असून, त्याने २००४ मध्ये ग्रीसविरुद्द ६७व्या सेकंदाला गोल केला होता.
अल्बेनियाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. पण, आम्ही योग्य नियोजनबद्ध खेळ केल्याने त्यांचे आव्हान परतवू शकलो. – लुसिआनो स्पालेट्टी, इटलीचे प्रशिक्षक