वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्लोस अल्कराझ आणि नोव्हाक जोकोविच यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात असलेल्या इटलीच्या अग्रमानांकित यानिक सिन्नेरने आपली विजयी घोडदौड कायम राखताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अल्कराझला पराभवाचा धक्का देणाऱ्या बोटिक व्हॅन डे झँडशूल्पचे आव्हान मात्र तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले.

अल्कराझ आणि जोकोविच यांच्या पराभवातून धडा घेतलेल्या सिन्नेरने आपला खेळ अधिकच उंचावल्याचे पाहायला मिळाले. त्याने तिसऱ्या फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ख्रिास्तोफर ओकॉनलवर ६-१, ६-४, ६-२ अशी सहज मात केली. ओकॉनलने दुसऱ्या सेटमध्ये थोडा प्रतिकार केला. मात्र, पहिल्या आणि तिसऱ्या सेटमध्ये सिन्नेरच्या दमदार खेळाचे ओकॉनलकडे उत्तरच नव्हते. या लढतीत सिन्नेरने ओकॉनलची सर्व्हिस पाच वेळा तोडली आणि स्वत: १५ बिनतोड सर्व्हिस (एस) केल्या.

पुढील फेरीत सिन्नेरसमोर यजमान अमेरिकेच्या १४व्या मानांकित टॉमी पॉलचे आव्हान असेल. पॉलला तिसऱ्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, पहिला सेट गमावल्यानंतर त्याने खेळात सुधारणा करत कॅनडाच्या गॅब्रिएल डियालोला ६-७ (५-७), ६-३, ६-१, ७-६ (७-३) असे नमवले.

हेही वाचा >>>MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल

अमेरिकन स्पर्धेतील माजी विजेत्या डॅनिल मेदवेदेवनेही आपली यशस्वी कामगिरी सुरू ठेवली. पाचव्या मानांकित मेदवेदेवने इटलीच्या ३४व्या मानांकित फ्लाविओ कोबोल्लीचा ६-३, ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

दुसऱ्या फेरीत अल्कराझला धक्का देणाऱ्या नेदरलँड्सच्या व्हॅन डे झँडशूल्पला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. ब्रिटनच्या २५व्या मानांकित जॅक ड्रॅपरने त्याला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले. तसेच १०व्या मानांकित ब्रिटनच्या अॅलेक्स डी मिनाऊरने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा ६-३, ७-६ (७-४), ६-०, ६-० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. या लढतीत डी मिनाऊरने इव्हान्सची सर्व्हिस तब्बल नऊ वेळा तोडली.

बोपण्णासुत्जिआदी उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची जोडीदार इंडोनेशियाची अल्दिला सुत्जिआदी यांनी अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. बोपण्णा-सुत्जिआदी जोडीने ऑस्ट्रेलियाचा जॉन पीर्स आणि चेक प्रजासत्ताकची कॅतरिना सिनिआकोवा यांच्या जोडीला ०-६, ७-६ (७-५), १०-७ असे पराभूत केले.

श्वीऑटेक, सबालेन्काची आगेकूच

● पुरुषांमध्ये धक्कादायक निकाल नोंदवले जात असताना, महिला एकेरीत मात्र तारांकितांचेच वर्चस्व पाहायला मिळाले.

● पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑटेकने २५व्या मानांकित अनास्तासिया पावलुचेन्कोवाला ६-४, ६-२ असे नमवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

● दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काने एकतेरिना अलेक्झांद्रोवाचे आव्हान २-६, ६-१, ६-२ असे परतवून लावत आगेकूच केली.

● अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुलाने स्पेनच्या जेसिका मानेरोवर ६-३, ६-३ अशी मात केली.

अल्कराझ आणि जोकोविच यांचे आव्हान इतक्या लवकर संपुष्टात येईल असे कोणालाही वाटले नव्हते. खेळात काहीही होऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तुम्ही मानसिकदृष्ट्या खचलात किंवा खेळात चुका करायला लागतात, की त्याचा निकालावर मोठा परिणाम होतो. प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात करतात. त्यामुळे माझा कमीतकमी चुका करण्याचा प्रयत्न होता आणि पुढेही राहील. – यानिक सिन्नेर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Italy yannick sinner wins the us open tennis tournament sport news amy