Irfan Pathan compares Perth Test pitch to wife’s mood : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया चांगलीच मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. पर्थची खेळपट्टी किती हिरवीगार दिसते हे पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी या खेळपट्टीवर फलंदाजांना खेळणे कठीण जात होते. दुसऱ्या दिवशी खेळपट्टी थोडी बदललेली दिसली. टीम इंडियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने खेळपट्टीबाबत केलेले एक अतिशय मनोरंजक ट्विट समोर आले आहे. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इरफान पठाणचे ट्विट व्हायरल –

पर्थच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी भारतीय फलंदाज १५० धावांत सर्वबाद झाले होते, तर दुसऱ्या दिवशी भारतीय सलामी जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी आसुसले होते. याशिवाय दुसऱ्या दिवशी खेळपट्टीही बदलली. यासंदर्भात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एक फोटो पहिल्या दिवसाच्या खेळपट्टीचा होता आणि दुसरा फोटो दुसऱ्या दिवसाच्या खेळपट्टीचा होता.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये इरफानने लिहिले की, जेवढ्या वेळात माझ्या बायकोचा मूड बदलतो, त्यापेक्षा कमी वेळात खेळपट्टीचा नूर पालटला. इरफान पठाणची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. इरफानच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘मला वाटले टीव्ही खराब झाला आहे.’

हेही वाचा – Shreyas Iyer : IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरचा मोठा धमाका; षटकार-चौकारांचा पाऊस पाडत गोव्याविरुद्ध झळकावले वादळी शतक

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला –

पर्थ कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल ६२ धावा करून क्रीजवर आहे, तर यशस्वी जैस्वालने ९० धावा केल्या आहेत. टीम इंडियाची आतापर्यंतची एकूण आघाडी २१८ धावांची झाली आहे. भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर संपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे ४६ धावांची आघाडी होती. यशस्वीने आतापर्यंत १९३ चेंडूंचा सामना केला असून त्यात सात चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याचबरोबर राहुलने आतापर्यंत १५३ चेंडूंचा सामना केला असून त्यात चार चौकार मारले आहेत.