शैली आणि ताकद या दोघांइतकंच चिवट आणि शेवटपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीचा पुन:प्रत्यय घडवत नोव्हाक जोकोव्हिचने पाचव्यांदा अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत चार तास नऊ मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्कावर २-६, ७-६ (७-४), ३-६, ६-३, ६-४ अशी मात करत जोकोव्हिचने नदालविरुद्धच्या महामुकाबल्यात आपले स्थान पक्के केले. जोकोव्हिचसाठी ही बारावी ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी, तर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची सलग चौथी वेळ असणार आहे.
‘वॉवरिन्काने निश्चितच आक्रमक खेळ केला. तो अधिक चांगले टेनिस खेळला. परिस्थितीशी जुळवून घेत चांगला खेळ करण्याचा माझा प्रयत्न होता. आम्हा दोघांसाठी हा सामना कठीण होता. मला खूप धावावे लागले, सूर गवसण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागली, मात्र मोक्याच्या क्षणी मला माझा खेळ उंचावता आले याचे समाधान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणाऱ्या वॉवरिन्काचे मी आभार मानतो. हा एक अफलातून सामना होता’, असे जोकोव्हिचने सांगितले.
पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या वॉवरिन्काची पहिली सव्र्हिस कमकुवत होती. दुसरीकडे जोकोव्हिचच्या हातून असंख्य टाळता येण्याजोग्या चुका झाल्या. मात्र दोन सेटनंतर या चुकांतून सावरत जोकोव्हिचने लौकिलाला साजेसा खेळ केला आणि अंतिम फेरीत स्थान पटकावले.
या विजयामुळे जागतिक क्रमवारीत जोकोव्हिचने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. अंतिम लढतीचा काहीही निकाल लागला तरी जोकोव्हिचच्या अव्वल स्थानाला धोका असणार नाही. दरम्यान, तडाखेबंद फॉर्ममध्ये असणाऱ्या नदालचा जोकोव्हिचला मुकाबला करायचा आहे. या द्वंदात नदाल २१-१५ असा आघाडीवर आहे. यंदाच्या वर्षांत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद जोकोव्हिचने पटकावले आहे, तर फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद नदालने पटकावले आहे. पोतडीत आणखी एका जेतेपदाची भर घालण्यासाठी दोघेही अतिशय उत्सुक आहेत.
पहिला सेट जिंकत वॉवरिन्काने खळबळजनक सुरुवात केली. फोरहँड, बॅकहँड आणि कोर्टचा सुरेख उपयोग करत वॉवरिन्काने वर्चस्व साधले. जोकोव्हिचच्या हातून झालेल्या चुकांचा पुरेपूर फायदा वॉवरिन्काने उठवला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने नेहमीप्रमाणे प्रदीर्घ रॅलीवर भर दिला. वॉवरिन्काला चुका करायला भाग पाडत जोकोव्हिचने १-१ बरोबरी केली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये वॉवरिन्काने आक्रमक खेळ करत हा सेट जिंकला. वॉवरिन्काकडे असणाऱ्या २-१ आघाडीमुळे जोकोव्हिचवर दडपण होते, मात्र दडपणाच्या क्षणी खेळ उंचावण्याच्या क्षमतेचा प्रत्यय जोकोव्हिचने घडवला. चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये कमीत कमी चुका करत, अचूक सव्र्हिसवर भर देत, सर्व प्रकारच्या फटक्यांचा नेमकेपणाने वापर करत जोकोव्हिचने सामना जिंकला.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या राफेल नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्क्वेटचा ६-४, ७-६ (१), ६-२ असा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत आगेकूच केली. या विजयासह गॅस्क्वेटविरुद्धच्या सर्व ११ लढतीत नदालने विजयी परंपरा कायम राखली. गेल्यावर्षी गुडघ्याच्या दुखापतीमुळे नदाल अमेरिकन खुल्या स्पर्धेत खेळू शकला नव्हता. मात्र यंदा नदालचा विजयरथ रोखणे प्रतिस्पध्र्यासाठी अवघड ठरले आहे. यंदाच्या हंगामात हार्डकोर्टवर नदालची कामगिरी २१-० अशी आहे.
दुखापतीनंतर परतलेल्या नदालने आपल्या सव्र्हिसवर मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. गॅस्क्वेटविरुद्ध पहिला सेट त्याने दमदार सव्र्हिसच्या जोरावर जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये गॅस्क्वेटने चिवट झुंज देत मुकाबला टायब्रेकरमध्ये नेला. मात्र यामध्ये नदालने सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये वेगवान खेळ करत नदालने विजयावर शिक्कामोर्तब केले.
आंद्रेआ लाव्हाकोव्हा-ल्युसी ऱ्हाडेका अजिंक्य
न्यूयॉर्क : चेक प्रजासत्ताकच्या आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युसी ऱ्हाडेका जोडीने अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला. पाचव्या मानांकित या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित अॅशलेह बार्टी आणि कॅसे डेलाअॅक्वा जोडीवर ६-७ (४-७), ६-१, ६-४ अशी मात केली. लाव्हाकोव्हाने बेलारुसच्या मॅक्स मिर्नीच्या साथीने मिश्र दुहेरीचे जेतेपदही पटकावले होते. याच जोडीने यंदाच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेचेही जेतेपद नावावर केले होते.
नदाल-जोकोव्हिच आमनेसामने
शैली आणि ताकद या दोघांइतकंच चिवट आणि शेवटपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीचा पुन:प्रत्यय घडवत नोव्हाक जोकोव्हिचने
First published on: 09-09-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its a blockbuster novak djokovic rafael nadal set up us open final clash