आपल्याच मातीत प्रतिस्पध्र्यावर अनेक संघ मर्दुमकी गाजवतात, पण त्यांची खरी परीक्षा असते ती परदेशातील भूमीवर. आतापर्यंत भारताने मायदेशात बऱ्याचदा प्रतिस्पध्र्याना चारी मुंडय़ा चीत केले असले, तरी त्यांना एकदिवसीय मालिकेत अजूनपर्यंत विदेशात निर्भेळ यश संपादन करता आले नव्हते. पण झिम्बाब्वे दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या ‘यंग ब्रिगेड’ने ही किमया साधली. यजमानांना पाचही सामन्यांमध्ये भुईसपाट केले आणि ५-० अशा निर्विवाद विजयासह ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाचव्या एकदिवसीय सामन्यात लेग स्पिनर अमित मिश्राने सहा बळी घेत झिम्बाब्वेचे कंबरडे मोडले आणि त्यांचा डाव १६३ धावांमध्येच संपुष्टात आणला. या आव्हानाचा पाठलाग करताना पुनरागमनाच्या संधीचे सोने करत अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावले आणि संघाला सात विकेट्स राखून सहज विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकत भारताने झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या करण्यापासून वंचित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ३ बाद ३७ अशी दयनीय अवस्था असताना सीन विल्यम्स फलंदाजीला आला आणि त्याने संघाला सावरत सहा चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी साकारली, पण अमितने त्याचा अडसर दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर झिम्बाब्वेचा अर्धा संघ तंबूत धाडत त्याने झिम्बाब्वेच्या डावाला खिंडार पाडले. मिश्राने ४८ धावांत सहा बळी मिळवत झिम्बाब्वेच्या संघाला हादरवले आणि त्यांना १६३ धावांवरच समाधान मानावे लागले.
झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भोपळाही फोडण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराला (०) भारताने गमावले. पण त्यानंतर शिखर धवन (४१) आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाला सावरत संघाला विजयाची दिशा दाखवली. धवन बाद ़झाल्यावर अजिंक्यला रवींद्र जडेजाची (नाबाद ४८) चांगली साथ लाभली. अजिंक्यने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी साकारली. अजिंक्य बाद झाल्यावर जडेजाने षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
झिम्बाब्वे : वुशीमुझी सिबांडा झे. कार्तिक गो. उनाडकट ५, हॅमिल्टन मसाकाझा त्रि. गो. जडेजा ३२, ब्रेन्डन टेलर झे. रैना गो. शर्मा ०, टायमिसीन मरुमा झे. कार्तिक गो. शामी ४, सीन विल्यम्स झे. कोहली गो. मिश्रा ५१, माल्कम वॉलर झे. शर्मा गो. मिश्रा ८, एल्टन चिगुम्बुरा पायचीत गो. मिश्रा १७, तिनोतेंडा मुतोम्बोडझी झे. रैना गो. मिश्रा ४, नतासाई मुश्वांग्वे त्रि. गो. मिश्रा १६, कायले जाव्‍‌र्हिस नाबाद १२, ब्रायन व्हिटोरी झे. कोहली गो. मिश्रा ४, अवांतर (लेग बाइज ४, नो बॉल ३, वाइड ३) १०, एकूण ३९.५ षटकांत सर्व बाद १६३.
बाद क्रम : १-१३, २-२३, ३-३७, ४-४५, ५-७२, ६-१२२, ७-१२६, ८- १३३, ९-१५५, १०-१६३.
गोलंदाजी : मोहित शर्मा ६-०-२५-१, जयदेव उनाडकट ६-१-८-१, रवींद्र जडेजा १०-०-४२-१, मोहम्मद शामी ७-१-२७-१, सुरेश रैना २-०-९-०, अमित मिश्रा ८.५-०-४८-६.
भारत : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. जार्विस ०, शिखर धवन झे. टेलर गो. जाव्‍‌र्हिस ४१, अजिंक्य रहाणे त्रि. गो. वॉलर ५०, रवींद्र जडेजा नाबाद ४८, दिनेश कार्तिक नाबाद १०, अवांतर (बाइज ४, लेग बाइज २, वाइड १२) १८, एकूण ३४ षटकांत ३ बाद १६७.
बाद क्रम : १-०, २-५५, ३-१२६.
गोलंदाजी : कायले जाव्‍‌र्हिस ८-३-१८-२, ब्रायन व्हिटोरी ५-०-४१-०, एल्टन चिगुम्बुरा ४-०-११-०, नतासाई मुश्वांग्वे ६-०-२६-०, तिनोतेंडा मुतोम्बोडझी ५-०-२९-०, सीन विल्यम्स २-०-१८-०, माल्कम वॉलर ४-०-१८-१.
सामनावीर : अमित मिश्रा.
मिश्राचा बळींचा षटकार
बुलावायो : झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ‘लेग स्पिनर’ अमित मिश्रा याने बळींचा षटकार पूर्ण करत, भारताच्या एका सामन्यातील सर्वाधिक बळी मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. मिश्राने पाचव्या सामन्यात ८.५ षटकांमध्ये ४८ धावांमध्ये सहा बळी मिळवले आहेत. यापूर्वी भारताच्या पाच गोलंदाजांनी ही किमया साधली आहे. यापूर्वी आशिष नेहराने दोनदा, तर अनिल कुंबळे, अजित आगरकर, मुरली कार्तिक आणि एस. श्रीशांत यांनी एकदा एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा बळी मिळवले आहेत. अमित मिश्रा ८.५-०-४८-६

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा