Sanjay Manjrekar says Its about Indian cricket not who the Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाला गौतम गंभीरच्या रूपाने नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक होण्यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. गौतम गंभीरला पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याबद्दल चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कौतुक केले होते. गंभीरच्या आधी मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचा कार्यकाळ २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपला. आता माजी क्रिकेपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकांबाबत केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.

आता या सर्व कौतुकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज संजय मांजरेकर संतापताना दिसले. मांजरेकर म्हणाले की, हे विधान केवळ प्रशिक्षकांबाबत नाही तर भारतीय क्रिकेटबाबत आहे. ज्यांच्या नावावर चार विश्वचषक आहेत. राहुल द्रविडच्या कार्यकाळानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारत असताना संजय मांजरेकर यांचे वक्तव्य आले आहे.

संजय मांजरेकरांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल –

संजय मांजरेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘लालचंद राजपूत, गॅरी कर्स्टन आणि द्रविड हे कोच नव्हते का? हे ते कोच आहेत. ज्यांनी भारताला १९८३, २००७, २०११ आणि २०२३ मध्ये विश्वचषक जिंकून दिला. हे वास्तविक भारतीय क्रिकेटबद्दल आहे, प्रशिक्षक कोण आहे याच्याबद्दल नाही. त्यामुळे या दोघांमध्ये थेट संबंध आहे असा विचार करणे थांबवण्याची वेळ आली आहे.’

हेही वाचा – Paris Olympic 2024: ग्रुप फोटो काढताना हँडबॉल खेळाडूने हॉकी प्लेअर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, गुडघ्यावर बसून… पुढे काय घडलं? पाहा VIDEO

श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरच्या कार्यकाळाला सुरुवात –

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्याचा केला. त्यावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले होते. आता गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू करणार आहे. मुख्य प्रशिक्षकासोबतच भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारातही बदल करण्यात आला आहे. आता सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे.