अष्टपैलू परवेझ रसूलला झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्भाग्यपूर्ण होते, अशी खंत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. झिम्बाब्वे दौऱ्यावरील भारताच्या गोलंदाजीच्या योजनेत तो चपखलपणे बसू शकला नाही, म्हणूनच त्याला संधी मिळू शकली नाही, असे समर्थन कोहलीने या वेळी केले.
‘‘संधी न मिळाल्याबद्दल लोक काय बोलतायत, याची मी खरेच चिंता करीत नाही. कारण ज्या खेळाडूंना या पाच सामन्यांत संधी मिळाली, त्यांनी दोन महिने किंवा अधिक काळ संघासोबत संधीच्या प्रतीक्षेत घालवले आहेत,’’ असे कोहलीने सांगितले. रसूलने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले असते तर भारतीय संघात स्थान मिळवणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला असता.
दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना भारताने मालिका ५-० अशी जिंकली. मालिकेत विजयी आघाडी असल्यामुळे अखेरच्या एकदिवसीय सामन्यांत रसूलला संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु २४ वर्षीय रसूलला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल, असा अशावाद कोहलीने या वेळी प्रकट केला.
‘‘परवेझला माहीत होते की, भारताच्या गोलंदाजीची रचना सूत्रबद्ध आहे आणि त्यात फारसा बदल होऊ शकणार नाही. दुर्दैवाने त्याला एकाही सामन्यात संधी मिळू शकली नाही. भविष्यात तो आणखी काही मालिका खेळेल आणि त्याला आपले कौशल्य दाखविण्यासाठी नक्की खेळता येईल,’’ असे कोहलीने सांगितले.
अन्य अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाऐवजी रसूलला संधी देता आली असती, या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘‘जडेजासारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणे, हे नेहमी कठीण असते. कोणत्याही अवघड परिस्थितीमध्ये बळी घेण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे.’’
‘‘मालिकेतील कोणताही सामना कमी महत्त्वाचा मानणे, आम्हाला मन्य नव्हते. त्यामुळे गोलंदाजीच्या विभागामध्ये आम्हाला फार बदल नको होते. मिश्राला आतापर्यंत बऱ्याच सामन्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या मालिकेत आम्ही त्याला पाच सामन्यांत खेळवले,’’ असे कोहलीने सांगितले.
‘‘आता भारतीय ‘अ’ संघासोबत परवेझ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्या ठिकाणी अधिकाधिक सामन्यांमध्ये खेळून मोठा अनुभव त्याच्या गाठीशी येईल. त्याला भारतीय संघात नक्की स्थान मिळेल. जडेजासारख्या खेळाडूला विश्रांती देऊन गोलंदाजीच्या माऱ्यात बदल करणे योग्य नव्हते,’’ अशा शब्दांत कोहलीने आपली बाजू मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा