सेरेना विल्यम्सच्या नावावर १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत, तर अॅना इव्हानोव्हिकच्या नावावर अवघे एक ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. सातत्याने जेतेपदे पटकावण्यासाठी सेरेना प्रसिद्ध आहे, तर गुणवत्ता असूनही अॅनाचा वावर प्राथमिक फेऱ्यांपुरता मर्यादित राहतो. या समीकरणांमुळेच यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सेरेना प्रबळ दावेदार मानली जात होती, तर अॅनाचे नाव संभाव्य विजेत्यांच्या परिघाच्या बाहेर होते, मात्र रविवारी चमत्कार घडू शकतात याचा प्रत्यय आला. सर्बियाच्या अॅना इव्हानोव्हिकने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर मात करत स्पर्धेतील पहिल्या खळबळजनक निकालाची नोंद केली.
सेरेना विल्यम्सने पहिला सेट जिंकत नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात केली, मात्र दुखापतीमुळे हालचालींवर मर्यादा आलेल्या सेरेनाच्या खेळाचा आणि तिच्या हातून घडणाऱ्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत इव्हानोव्हिकने दुसरा सेट नावावर केला. या सेटमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या अॅनाने निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सर्वोत्तम खेळ करत कारकिर्दीतील संस्मरणीय विजयाची नोंद केली. अॅनाने हा मुकाबला ४-६, ६-३, ६-३ असा जिंकला.
ब्रिस्बेन खुली स्पर्धा जिंकत सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासाठी आपण तयार असल्याचे सिद्ध केले होते. या जेतेपदासह ख्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या १८ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती. या अनपेक्षित पराभवामुळे सेरेनाची ही संधी हुकली आहे.
सेरेनाच्या झंझावातापुढे ग्रँड  स्लॅम स्पर्धाच्या अंतिम लढती एकतर्फी ठरतात, पण आता मात्र हे चित्र बदलणार आहे. जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उत्सुक व्हिक्टोरिया अझारेन्का, खांद्याच्या दुखापतीतून सावरत विजयी पुनरागमनासाठी आतुर मारिया शारापोव्हा, उपविजेतेपदावर समाधान न मानता जेतेपद मिळावे यासाठी प्रयत्नशील लि ना आणि हा विजय चमत्कार न मानता जेतेपदासाठी दावेदारी मांडणारी अॅना इव्हानोव्हिक यांना आता मैदान मोकळे झाले आहे.
‘‘पाठीच्या दुखण्यामुळे आपल्या कामगिरीवर परिणाम झाला. या दुखण्याची तीव्रता वाढल्याने डॅनियल हन्तुचोव्हाविरुद्धच्या लढतीत माघार घेणार होते. मात्र झुंज देण्याचे ठरवल्याने अॅनाविरुद्ध खेळले. माझ्या हातून प्रचंड चुका झाल्या. दुखापतीमुळे वावरावर मर्यादा आल्या,’’ असे सेरेनाने सांगितले.
अन्य लढतींमध्ये चीनच्या लि नाने रशियाच्या २२व्या मानांकित एकाटेरिना माकारोव्हाचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. लि नाचा पुढचा मुकाबला इटलीच्या फ्लॅव्हिआ पेनेन्टाशी होणार आहे. पेनेन्टाने अँजेलिक्यू कर्बरचा ६-१, ४-६, ७-५ असा पराभव केला. कॅनडाच्या इग्युेनी बोऊचार्डने ऑस्ट्रेलियाच्या कॅसे डेलाक्युआवर ६-७ (५-७), ६-२, ६-० अशी मात केली.
पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने फॅबिओ फॉगनिनीला ६-३, ६-०, ६-२ असे सहज नमवत अंतिम आठमध्ये धडक मारली. स्पेनच्या डेव्हिड फेररने जर्मनीच्या फ्लोरिअन मेयरचा ६-७ (५-७), ७-५, ६-२, ६-१ असा पराभव केला.
पेस-स्टेपानेक उपांत्यपूर्व फेरीत
मेलबर्न : लिएण्डर पेस-राडेक स्टेपानेक या अनुभवी जोडीने भारताच्या युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस जोडीवर ६-३, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. १२व्या मानांकित ट्रीट ह्य़ू आणि डॉमिनिक इंगलोट जोडीने रोहन बोपण्णा-ऐसाम उल हक कुरेशी जोडीवर
६-४, ७-६ (१) असा विजय मिळवला.

Story img Loader