रेल्वेविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकाला गवसणी घालत सौराष्ट्रच्या रवींद्र जडेजाने एक अनोख विक्रम रचला आहे. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तीन त्रिशतके लगावणारा जडेजा पहिला भारतीय आणि क्रिकेट विश्वातला आठवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुंबईचा वसिम जाफर आणि हैदराबादच्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना प्रथम श्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावता आली होती. जडेजाच्या नाबाद ३२० धावांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ५३२ अशी मजल मारली आहे. पहिल्या दिवशी जडेजाने नाबाद १११ धावा फटकावल्या होत्या, दुसऱ्या दिवशी त्याने रेल्वेच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण केले. नाबाद ३२० धावांच्या खेळीत जडेजाने २८ चौकार आणि ७ षटकार लगावले.
४ बाद ९० अशी सौराष्ट्रची अवस्था असताना जडेजा आणि सितांशू कोटक (६८) यांनी पाचव्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी रचत संघाला सावरले, पण कोटक गेल्यावरही जडेजाने अप्रतिम दणकेबाज फलंदाजी करत संघाला पाचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Story img Loader