इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ढकलण्याच्या तसेच आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या कथित आरोपांतून भारताच्या रवींद्र जडेजाची मुक्तता झाली आहे. या आरोपांसाठी त्याच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कलम २ या गंभीर कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत जडेजा या कलमांनुसार दोषी आढळला नाही. मात्र त्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी जडेजाची काहीही चूक नाही, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू उपाहारासाठी परतत असताना जेम्स अँडरसनने जडेजाला उद्देशून आक्षेपार्ह भाषा तसेच ढकलण्याचा आरोप भारतातर्फे करण्यात आला होता. इंग्लंड संघ व्यवस्थापनाने सुरुवातीला हा किरकोळ प्रसंग असल्याचे म्हटले होते. मात्र काही तासांतच त्यांनी जडेजाविरुद्ध तक्रार दाखल केली.
साऊदम्प्टन येथे दोन तास चाललेल्या सुनावणीनंतर बून यांनी जडेजावर खेळभावनेला अनुसरून नसलेल्या वर्तनासाठी दंडात्मक कारवाई केली.
अँडरसन आणि जडेजा यांच्यात अशा स्वरूपाची घटना झाल्याचे बून यांनी मान्य केले मात्र जडेजा कलम २ नुसार दोषी आढळण्यासाठी आवश्यक पुरावे नसल्याने त्यांनी जडेजाची या आरोपांतून मुक्तता केली.
निर्णयावरून बीसीसीआय, आयसीसीत जुंपणार
जडेजाला झालेली दंडात्मक शिक्षा बीसीसीआयला मान्य नसल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी जडेजाची कोणतीही चूक नसून, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. मात्र कलम १ अंतर्गत जडेजाला शिक्षा सुनावण्यात आल्याने या निर्णयाविरोधात बीसीसीआयला दाद मागता येणार नाही. हा निर्णय खेळाडू तसेच संघव्यवस्थापनासाठी बंधनकारक आहे. दरम्यान, भारतीय संघाने अँडरसनविरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी आयसीसीतर्फे नियुक्त न्यायिक आयुक्त गॉर्डन लुइस यांच्यासमोर १ ऑगस्टला होणार आहे. अँडरसनवर कलम ३ नुसार आरोप दाखल करण्यात आले आहेत. सुनावणीत दोषी आढळल्यास अँडरसनला २ ते ४ कसोटीची बंदीची शिक्षा होऊ शकते.
रवींद्र जडेजाला दंड
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ढकलण्याच्या तसेच आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या कथित आरोपांतून भारताच्या रवींद्र जडेजाची मुक्तता झाली आहे.
First published on: 26-07-2014 at 12:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jadeja fined for anderson fracas