वानखेडे स्टेडियमवर १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या ‘अ’ गटातील रणजी सामन्यासाठी अनुभवी फलंदाज वसिम जाफरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. झारखंडविरुद्धच्या मागील सामन्यात नेतृत्व करणारा अभिषेक नायर दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.
‘‘झारखंडविरुद्धच्या सामन्यात नायरच्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. याच सामन्यात अकबर खानचा हात फॅ्रक्चर झाल्यामुळे तोसुद्धा ओडिशाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. कौस्तुभ पवार आणि बलविंदरसिंग संधू (ज्यु.) या दोघांचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
‘‘या हंगामाच्या पूर्वार्धातच दुखापत झालेला वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी पुढील १५ दिवस मुंबईसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही,’’ असे दलाल यांनी पुढे सांगितले. मुंबईने झारखंडविरुद्धचा आपला पाचवा रणजी सामना अनिर्णीत राखताना एक गुण मिळवला होता. त्यामुळे सर्वाधिक २० गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.
मुंबईचा संघ : वसिम जाफर (कर्णधार), आदित्य तरे (यष्टीरक्षक), कौस्तुभ पवार, हिकेन शाह, सूर्यकुमार यादव, बलविंदरसिंग संधू (ज्यु.), विशाल दाभोळकर, सिद्धेश लाड, जावेद खान, शार्दुल ठाकूर, सुशांत मराठे, क्षेमल वायंगणकर, मनीष राव, प्रवीण तांबे आणि सागर केरकर. प्रशिक्षक : सुलक्षण कुलकर्णी.

Story img Loader